कर्दे गावास सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार

    01-Oct-2024
Total Views |
 
 
ka
 
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार-2024 प्रदान करण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या स्पर्धे त यश मिळवल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी कर्दे गावाचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील 991 गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींत 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातील 126 ग्रामपंचायतींनी यात सहगभाग घेतला होता.
 
स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसरामुळे पर्यटकांना आकर्षित करते. हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनांसाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे.