दिवाळीसाठी उत्तरेत जाण्याकरिता पुण्यातून 180 जादा रेल्वे

रेल्वे प्रशासनाचे नियोजन : उत्तर, दक्षिण भारत व विदर्भातील प्रवाशांना मिळाला दिलासा

    01-Oct-2024
Total Views |
 
di
 
पुणे, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
दिवाळीच्या काळात रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना गावी कसे जावे, असा प्रश्न पडला आहे; पण रेल्वे प्रशासनाने आता दिवाळीच्या काळात सुमारे 180 विशेष गाड्या सोडणार असल्याने ऐनवेळी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत व विदर्भ या भागांतील नागरिक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहतात. दिवाळी सण साजरा करण्यासाठी ते प्रत्येक वर्षी गावी जातात. त्यामुळे उत्तरेत जाणाऱ्या गाड्यांना दिवाळीच्या काळात मोठी गर्दी असते. त्यासाठी नागरिक दिवाळीसाठी अगोदरच गाड्यांचे आरक्षण करतात. यंदा दिवाळीच्या काळातील बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे.
 
रेल्वेगाड्यांना आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांची धांदल उडत आहे. दिवाळीच्या दोन महिने आधीच रेल्वे फुल्ल असल्याने प्रवासी हतबल झाले आहेत. त्यामुळे रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे पुण्यातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या नागपूर, गोरखपूर, दानापूर, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस व इतर काही प्रमुख गाड्यांना वेटिंग, तर काही गाड्या रिग्रेट दाखवत आहेत. वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार करून पुणे विभागातून रेल्वे प्रशासनाकडून 180 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आणखी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार मालदा टाउन व दानापूर येथे 30 पेक्षा जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.
 
दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून पुण्यातून 180 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. ऐनवेळी होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी आणखी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन सुरू असल्याचे पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले.