राजन लाखे यांचा बालकाव्यसंग्रह ‌‘ढब्बू ढेरपोट्या' याचे प्रकाशन संपन्न

    19-Jan-2024
Total Views |
 
rea
 
पिंपरी, 18 जानेवारी (आ.प्र.) :
 
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व ज्ञानगंगा प्रकाशन पुणे प्रकाशित ‌‘ढब्बू ढेरपोट्या' या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. न. म. जोशी, तर इतर मान्यवरांमध्ये कवयित्री डॉ. संगीता बर्वे, लेखक ल. म. कडू, कवी राजन लाखे, शिरीष चिटणीस, उदय पाटील उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. न. म. जोशी म्हणाले, लहान मूल किंवा मोठ्या व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियेत फरक असतो असे नाही. मोठी व्यक्ती विचार करू शकत नाही असे काही विचारही मुले करतात. बालसाहित्यातून मुलांची निरीक्षण, विचारशक्ती वाढीस लागणे महत्त्वाचे आहे.
 
 
 
dh
 
राजीव तांबे म्हणाले, ‌‘मूल जेव्हा बालसाहित्य वाचते तेव्हा त्याला ते भावलेले असते. काही वर्षांनंतर तेच साहित्य वाचनात आल्यानंतर त्यातील न उलगडलेले संदर्भही त्याला कळायला लागतात. बालसाहित्य बहुस्तरात्मक असेल तरच ते टिकते.' काव्य आणि त्याखाली तात्पर्य अशा पद्धतीने केलेली या बालकाव्यसंग्रहातील मांडणी विलक्षण असल्याची भावना साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ल. म. कडू यांनी व्यक्त केली. मुले साहित्य वाचनाकडे आकर्षित होत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या. बालकाव्यसंग्रहाच्या या प्रकाशन सोहळ्यात प्रकाश पारखी, संज्ञा कुलकर्णी यांच्या अधिपत्याखालील बालकलाकार श्रेया देशपांडे, कणाद सहस्रबुद्धे, चिन्मय फाटक, चैतन्य फाटक, ईेशरी जोशी, गार्गी काळे, तर स्वरोपासनाची भाग्यदा कुलकर्णी या बालकांनी काव्याविष्कार सादर केला. प्रकाशन सोहळ्यात दिविशा मोहोरे ही चिमुकली, सोहळ्याचे आकर्षण ठरली. कुमारी कनिष्का बने हिने गणेश वंदना नृत्य सादर केले, तर गायिका रिचा राजन हिने जय शारदे वागेिशरी या गीताने सुरवात केली. राजन लाखे यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका विशद केली. चिटणीस यांनी प्रास्तविक केले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले तसेच आभार मानले.