अवमानकारक भाषा वापरणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार

07 Sep 2023 17:29:57
 
pmc
 
पुणे, 6 सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अवमानकारक उल्लेख केला जात असेल, त्यांची आई-बहीण काढली जात असेल, तर यापुढे सहन केले जाणार नाही. जशास तसे उत्तर देऊन महापालिका युनियनची ताकद दाखवून देऊ, असा इशारा महापालिका कामगार युनियनच्या वतीने देण्यात आला. पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्याबाबत सोमवारी पुण्येश्वर पुननिर्माण समितीच्या वतीने महापालिकेवर काढलेल्या मोर्चा दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त विधाने केली.
 
या निषेधार्थ मंगळवारी महापालिका कामगार युनियनच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राणे आणि लांडगे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत जोरदार इशारा दिला. पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येेशर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनादरम्यान आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे या दोन्ही नेत्यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती.
 
त्या विधानाच्या निषेधार्थ पुणे महापालिकेमध्ये पुणे महानगरपालिका कामगार युनियन आणि अभियंता संघाच्या वतीने काळ्या फिती बांधून आंदोलन केले. पुणे महानगरपालिका कामगार युनियन आणि अभियंता संघाच्या पदाधिकाऱ्यांसह पुणे महापालिका नगर अभियंता प्रशांत वाघमारे, विद्युत विभागाचे शहर अभियंता श्रीनिवास कंदुल, अधीक्षक अभियंता व्ही.जी. कुलकर्णी, अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण प्रमुख माधव जगताप, सुनील कदम आदी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रशांत वाघमारे म्हणाले की, पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणाबाबत काही संघटनांनी आंदोलन केले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
 
पण, काल आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांबद्दल जी भाषा वापरली गेली आहे, ती योग्य नसून या शहरामध्ये आम्ही अनेक वर्षांपासून अधिकारी म्हणून काम करीत आहोत, एका रात्रीमध्ये शहराचा विकास झालेला नाही, तर अनेक वर्षे काम केल्यानंतर शहर प्रगतिपथावर गेले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी या कोणत्याही व्यक्तींबद्दल योग्य भाषा वापरली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‌‘या आंदोलनाला शहराबाहेरील लोकप्रतिनिधी आले होते. महापालिकेने संवेदनशील विषय नेहमीच चर्चे ने हाताळले आहेत. परंतु, त्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनातील अधिकाऱ्यांबद्दल एकेरी आणि अवमानजनक भाषा वापरली. ते ही भाषा वापरत असताना, येथे आमच्यासोबत अनेक वर्षे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, याचे वैषम्य वाटते.' माधव जगताप म्हणाले, ‌‘महापालिकेचा कर्मचारी आपल्या पायाखाली तुडवण्यासाठीच आहे, हे सातत्याने घडत आहे.
 
निषेध व्यक्त करून आपण पुन्हा नागरिकांसाठीच्या कामांसाठी लागतो. कुणी बाहेरचा माणूस येईल, तो इथे येऊन आमच्या अधिकाऱ्यांबद्दल वाईट बोलत असेल, तर खपवून घेणार नाही. आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत. परंतु, आम्हाला षंढ समजता का? आमच्या कामात अडथळा आणू नका. प्रशासनाबाबत काही भूमिका असेल, तर कायदेशीर पद्धतीने मांडा. परंतु, अशा पद्धतीने काम झाले तर, आम्ही जशास तसे उत्तर देऊ. यापुढे कामगार युनियनची ताकद दाखवून देऊ. एकेरी उल्लेख तर सोडा, नावही सन्मानाने उच्चारले पाहिजे. आमच्यावर अशी परिस्थिती असेल, तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आईबहीण रोज काढली जाते. यापुढे आम्ही सोडणार नाही. युनियन म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ताकद दाखवून देऊ,' असा इशारा जगताप यांनी दिला.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0