उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलीप ग्रीन यांनी उपमुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. शिक्षण, कृषी आणि पर्यटन या विषयांवर चर्चा करताना उपमुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतील उच्चायु्नत मॅजेल हिंद; तसेच उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डाॅ. श्रीकर परदेशी उपस्थित हाेते.ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी तयार केलेल्या काैशल्य विकास अभ्यासक्रमाच्या साह्याने राज्यातील विद्यापीठांत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी करार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. ऑस्ट्रेलियातील अक्षय ऊर्जानिर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी उद्याेगात वापर करून अर्थव्यवस्था वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेक इन इंडियामध्ये याेगदान द्यायला ऑस्ट्रेलियाला आवडेल, असे ग्रीन यांनी सांगितले.