डॉ. श्रद्धा पुराणिक
(सल्लागार नेत्रचिकित्सक)
******************************
श्री मुकुंददास लोहिया नेत्रालय
पूना हॉस्पिटल
27, अलका थिएटरजवळ, गांजवेवाडी,
सदाशिव पेठ, पुणे - 411030.
फोन नं. : (020) 6609 6000 Ext. No. 3258
*********************************
लहान मुले बरेचदा डोकेदुखीची तक्रार करतात. बहुतांश वेळा ही डोकेदुखी गंभीर स्वरूपाची नसते. मात्र, पालकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रद्धा पुराणिक यांनी माहिती दिली आहे.
लहान मुलांना अनेक त्रास होतात आणि त्यात काही वेळा डोकेदुखीचाही समावेश असतो. बहुतेक वेळा ती गंभीर स्वरूपाची नसली, तरी खालील परिस्थितीत पालकांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
1) डोकेदुखीमुळे मुलीची/मुलाची झोपमोड होणे.
2) वारंवार डोके दुखणे.
3) डोक्याला मार लागल्यावर डोके दुखणे.
4) डोकेदुखीसोबत उलट्या, ताप, मानदुखी असणे.
5) दृष्टिदोष असणे.
डोकेदुखीची कारणे
1) संसर्गजन्य आजार/जंतुसंसर्ग.
2) डोक्याला मार लागणे.
3) अर्धशिशी (Migraine).
4) तणावग्रस्त जीवन.
5) मेंदूचे विकार.
काही वेळा डोळ्यांच्या समस्या, जसे की, चष्मा असणे किंवा तिरळेपणा असणे डोकेदुखीशी संबंधित असू शकतात. आपणास कमी दिसते ही गोष्ट सहसा लहान मुलांच्या स्वत:च्या लक्षात येत नाही. शाळेतील शिक्षक किंवा पालक ही तक्रार डॉक्टरांना सांगतात. बऱ्याच मुलांमध्ये प्राथमिक तपासणीनंतर ‘दृष्टिदोष नाही' असे समजते. ही मुले डोळ्यांतील स्नायूंचा (Ciliary Muscles) जास्त वापर करून, दृष्टी चांगली ठेवतात. शिवाय, ही प्रक्रिया प्रतिक्षिप्त (Involuntary) असते. स्नायूंच्या जास्त वापराने डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे, थकवा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशा मुलांच्या डोळ्यांतील स्नायूंवरील तणाव औषधाने नाहीसा करून, त्यांचे रिफ्रॅक्शन (चष्मा नंबर तपासणी) केली पाहिजे.
यासाठी डॉक्टर होमॅट्रोपीन, ॲट्रोपीन, सायक्लोपेटोलेटसारखी औषधे वापरतात. या तपासणीनंतर काही मुलांमध्ये असलेला सुप्त तिरळेपणासुद्धा (Latent Squint) लक्षात येतो. टॉर्चच्या साहाय्याने सोपी तपासणी करून तिरळेपणा तपासता येतो. तिरळेपणाचे अनेकविध उपचार जसे, की चष्मा नंबर तपासणी, डोळ्यांच्या स्नायूंचे व्यायाम अथवा शस्त्रक्रिया आपल्याला उपलब्ध असतात. लहान मुलांच्या दृष्टिदोषाची वेळीच तपासणी व्हायला हवी. अन्यथा, दृष्टिदोष लक्षात न आल्यास, वयाच्या सहा ते आठ वर्षांनंतर मुलांची दृष्टी कायमची कमजोर होऊ शकते. (Amblyopia or Lazy Eye). म्हणूनच डोकेदुखीची तक्रार घेऊन नेत्रतज्ज्ञांकडे आलेल्या प्रत्येक लहान मुलाची तक्रार आपण (पालक, शिक्षक आणि नेत्रतज्ज्ञ) गांभीर्याने घ्यावयास हवी.