पुणे, 29 सप्टेंबर (आ.प्र.) :
जय गणेश... गणपती बाप्पा मोरया... पुण्याचा अधिपती दगडूशेठ गणपती...च्या जयघोषात गुरुवारी (28 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी झाला. विसर्जन मिरवणुकीत दुपारी 4 वाजता सहभागी होण्यासंबंधी पूर्वीच केलेल्या घोषणेप्रमाणे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सांगता मिरवणुकीला थाटात प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत, लोकांचे अभिवादन स्वीकारत आणि ढोल-ताशांच्या गजरामध्ये डौलात निघालेल्या दगडूशेठ गणपतीचे पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता विसर्जन झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने यावर्षी श्री गणाधीश रथातून काढण्यात आली. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि या वर्षीची उत्सवातील सजावट असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा साकारण्यात आला होता. आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघाला. त्यामुळे दर्शनासाठी सकाळपासूनच रस्त्यांवर थांबलेल्या हजारोंचे डोळे दीपून गेले. या मिरवणुकीत अग्रभागी आरोग्य रथ सहभागी झाला होता. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती या विसर्जन रथावरून करण्यात आली.
याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्व-रूपवर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता; तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभतक् मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दुपारी चार वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेल्या दगडूशेठ गणपतीचे रात्री 8.20च्या सुमारास टिळक चौकामध्ये (अलका टॉकीज चौक) आगमन झाले. त्यावेळी भक्तांचा जल्लोष आणि उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला होता. मोरया... मोरया... च्या जयघोषाने आसमंत भरून गेला होता. उपस्थितांचे अभिवादन स्वीकारत दगडूशेठ गणपती नेहमीच्या दिमाखात मार्गस्थ झाला आणि पुढे पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता त्याचे विसर्जन करण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने हे शक्य झाल्याची भावना ट्रस्टच्या विश्वस्तांनी व्यक्त केली.