सध्या स्वत:चे घर असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी कर्जाचे पर्यायसुद्धा आहेत. मात्र, कमाई फार वाढत नसताना घरे महाग हाेत असल्याचे दिसते. एका पती-पत्नीच्या संवादांतील रूपाने हे समजून घ्या.‘तुम्ही ताे व्हिडिओ पाहिलात का?’ पूजाने तिचा पती राहुल याला हा प्रश्न केला. ताे स्वयंपाकघरात एक नवा पदार्थ बनविण्याच्या खटपटीत असल्याने त्याने फक्त ‘काेणता?’ एवढेच विचारले. पूजाने त्याच्यासमाेर टॅब्लेट ठेवला आणि राहुलला ताे व्हिडिओ पाहावा लागला. पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी ब्रेक घेतल्याने पूजा माेकळी असायची आणि त्यामुळे तिला साेशल मीडियाचा नाद लागला हाेता.आर्थिक स्थिती उत्तम असलेली एक व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत हाेती आणि ताे माणूस इनफ्ल्युएन्सर वाटत हाेता. 20 टक्के डाउन पेमेंंट लाेकांना खूप वाटते असे सांगत हा माणूस दहा लाख डाॅलर किंमत असलेल्या एका घराचे उदाहरण देत हाेता.
दहा लाख डाॅलरचे 20 टक्के डाउन पेमेंट म्हणजे दाेन लाख डाॅलर झाले. मात्र, काळ्या बाजारात अडीच लाख डाॅलरला किडनी विकून डाउन पेमेंटची व्यवस्था करता येऊ शकते आणि माणसाला दाेन नव्हे, एकाच किडनीची गरज असते, असेही ताे सांगत हाेता! म्हणजे, आता काेणीही एक किडनी विकून डाउन पेमेंटची व्यवस्था करू शकताे, असे त्याचे म्हणणे हाेते. हे घर भाड्याने देऊन त्या रकमेतून डाउन पेमेंटची रक्कम परत मिळवून त्यातून किडनी घेऊन शरीरात बसविता येईल. त्यामुळे एखाद्याकडे दाेन किडनींबराेबरच दहा लाख डाॅलरची संपत्तीही असेल, असे त्या माणसाचे सांगणे हाेते.असले विचित्र सल्ले देणारे इनफ्ल्युएसर्स सध्या साेशल मीडियावर सक्रिय असून, ते पाहण्यात लाेक गर्क हाेतात. ‘या माणसाच्या युक्तिवादात काय अडचणी आहेत हे तुला कळलेच असेल,’ असे राहुल म्हणाला.
‘हाेय, घर घेण्यासाठी किडनी विकण्याचा विचार अगदीच वाईट आहे,’ असे पूजा म्हणाली. त्यावर राहुल म्हणाला, ‘ते तर आहेच, पण मला आणखी वेगळेही दिसते. रिझर्व्ह बँकेने व्याजदरांत कपात केल्यावर आता ईएमआयचे दर कमी हाेऊन हप्ता कमी हाेणार असल्याचे मीडियात ठळकपणाने सांगितले जाते.पण, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी व्याजदर कमी हाेतील हे सांगितले जात नाही.’ त्यावर पूजाने ‘हे खरे आहे,’ असे मत व्यक्त केले. राहुल म्हणाला, ‘भारतासारख्या देशात खूप लाेक मुदत ठेवींच्या माध्यमातून बचत करतात. या ठेवींच्या व्याजातून अनेक निवृत्तांचा मासिक खर्च चालताे. पण, मुदत ठेवींवरील व्याजदर घटताे तेव्हा या निवृत्तांनाही खर्चात कपात करावी लागते आणि बचत करणाऱ्यांना तिचे प्रमाण वाढवावे लागते.
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांत केल्या जाणाऱ्या कपातीचा हा दुसरा परिणाम आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरांत कपात झाल्यावर लाेकही खर्च कमी करतात आणि त्याचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडताे.’ त्याचे बाेलणे समजत असल्याप्रमाणे पूजाने मान हलवली.राहुलचे बाेलणे पुढे चालू हाेते. ताे म्हणाला, ‘हा व्हिडिओ तयार करणाऱ्याने दुसऱ्या पर्यायाचा विचार केलेला नाही.घर घेण्यासाठी लाेक किडनी विकायला लागले, तर काळ्या बाजारात त्यांची संख्या वाढेल. अर्थात, हा विचार वाईटच आहे.पण, एवढ्या किडनी मिळायला लागल्यावर त्यांच्या किमती कमी हाेतील आणि काही लाेक ती विकण्याचा विचार रद्दही करतील.’ त्यावर, ‘किडनी विकून घर घेता येणार असले, तरी एक किडनीसुद्धा कमी हाेणार ना?’ असा प्रश्न पूजाने केल्यावर ‘असे व्हिडिओ गांभीर्याने घ्यावयाचे नसतात. ती मजाही असू शकते,’ असे राहुल म्हणाला.मात्र, ‘ही फार महाग मजा आहे.
आज जगभरात घरे महाग झाली आहेत आणि एखाद्याला किडनी घेण्यासाठी घर विकण्याची वेळही येत असेल,’ असे पूजा म्हणाली. संपन्न पाश्चात्त्य देशांमध्ये आता माेठ्या संख्येने मुले त्यांच्या पालकांकडे राहायला लागल्याची माहिती तिने दिली.ती म्हणाली, ‘ब्रिटनचे उदाहरण पाहा. सन 2021च्या जनगणेनुसार इंग्लंड आणि वेल्स या प्रांतांत आई-वडिलांसाेबत राहणाऱ्या प्राैढ मुलांची संख्या 49 लाख हाेती. सन 2011च्या जनगणेत ती 42 लाख हाेती.म्हणजे, आताची वाढ सुमारे 15 टक्के आहे.युराेपातील अन्य देशांतसुद्धा हेच चित्र आहे.अमेरिकेत 2000मध्ये वय वर्षे 25-34 वयाेगटांतील 12.4 टक्के पुरुष आणि 7.6 टक्के महिला त्यांच्या पालकांसाेबत राहत हाेते आणि 2022मध्ये हे प्रमाण अनुक्रमे 17.8 आणि 11.6 टक्के झाले.’ त्यावर ‘हे का हाेत आहे?,’ असा प्रश्न राहुलने केला. घरांच्या किमती माेठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्या प्रमाणात उत्पन्न वाढले नसणे हे मुख्य कारण असल्याचे पूजाने सांगितले.
सन 2000 ते 2021 या काळात अमेरिकेत विकल्या गेलेल्या घरांची सर्वसाधारण किंमत 150 ट्न्नयांपेक्षा वाढली आहे आणि याच काळात उत्पन्नातील वाढ 69 टक्के हाेती असे ती पुढे म्हणाल्यावर हे अंतर फार असल्याचे मत राहुलने व्यक्त केले. आता पूजाला उत्साह आला. ती म्हणाली, की ‘द इकाॅनाॅमिस्ट’च्या ‘हाउस प्राइस इंडे्नस’नुसार, या शतकाच्या पहिल्या दशकांत ब्रिटनमधील मालमत्तेच्या किमती सुमारे दुप्पट झाल्या आणि उत्पन्नात मात्र तेवढी वाढ झाली नाही. सन 2000 आणि 2001मध्ये ‘डाॅटकाॅम’चा बुडबुडा फुटल्यावर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरांत खूप कमी प्रमाणात घट केली.
त्यामुळे ‘डाॅटकाॅम’ आणि ‘टेलिकाॅम’ बुडबुड्यांचे रूपांतर रिअल इस्टेट बुडबुड्यात झाले, ताेही 2008मध्ये फुटला. त्यामुळे अमेरिका आणि युराेपातील अनेक बड्या वित्त संस्था अडचणीत आल्या.मध्यवर्ती बँकांना या संस्था वाचविणे भाग हाेते आणि त्याचवेळी अर्थव्यवस्थेत मंदी येऊ नये हेही पाहावे लागणार हाेते.त्यामुळे मध्यवर्ती बँकांनी चलनाची छपाई सुरू करून ते अर्थव्यवस्थेत टाकायला प्रारंभ केला. लाेकांनी पैसे उधार घेऊन ते खर्च करावेत, गुंतवणूक करावी अथवा व्यवसायाच्या विस्तारासाठी ताे वापरावा म्हणून कमी व्याजदरांत कर्ज देण्याचा विचार त्यामागे हाेता. पैसा फिरायला लागल्यावर आर्थिक घडामाेडींना वेग येऊन विकास हाेण्याची अपेक्षा हाेती.