महाराष्ट्र आणि काश्मीरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरी तरुणांसाठी सरहद संस्था करत असलेले कार्य माेलाचे असून, या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.पुण्यातील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या ‘हम सब एक है’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री बाेलत हाेते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनाेज सिन्हा, ‘सरहद’चे संजय नहार आदी उपस्थित हाेते. या कार्यक्रमात अमरनाथ यात्रा; तसेच काेविड काळात सामाजिक कार्यात याेगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील 73 नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या नागरिकांना वन इंडिया रिंगने सन्मानित करण्यात आले.
अनंतनागमध्ये चकमकीत शहीद झालेले लष्करी; तसेच पाेलिस अधिकारी व जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काश्मीरशी दृढ ॠणानुबंध हाेते, याचा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. पनवेलमध्ये काश्मिरी नागरिकांसाठी दिलेल्या जमिनीच्या विकासासाठी सर्वताेपरी सहकार्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी नायब राज्यपालांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्य्नत केले. आपण येत्या नवरात्राेत्सवात काश्मीर दाैऱ्यावर याल, त्यावेळी महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन केले जाईल.