मयूरेश्वर : मोरगाव

19 Sep 2023 16:31:04
 
ast
 
मयूरेश्वर : मोरगाव
 
गणपती हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. अष्टविनायक ही महाराष्ट्रातील मानाची देवस्थाने. महाराष्ट्रातील गणपतीच्या आठ देवळांच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात.
मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र. मोरगाव हे गणेशोपासनेच्या संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते.
 
  • मूर्तीबद्दल : मोरेश्वराची मूर्ती अतिशय भव्य आणि रेखीव आहे. मूर्तीच्या डोळ्यात हिरे बसवलेले असून डोक्यावर नागफणा आहे. असे मानले जाते की, ही मूळ मूर्ती नाही. खरी मूर्ती ही रत्नांचा चुरा, लोखंड आणि माती यांनी बनवलेली असून, ती आताच्या मूर्तीच्या मागे ठेवण्यात आली आहे. मूळ मूर्तीची स्थापना ही ब्रह्मदेवाने केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करत येथे आले असताना मूळ मूर्तीला धक्का लागू नये म्हणून पांडवांनी ती तांब्याच्या पत्र्यात बंदिस्त करून ठेवली आणि हल्लीची मूर्ती नित्य पूजेसाठी स्थापन केली, असे सांगण्यात येते.
  • आख्यायिका : कोणे एकेकाळी मिथिल देशात भंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा राजा होऊन गेला. त्याला सिंधू नावाचा पुत्र होता. सिंधूने उग्र तप करून सूर्याकडून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे तो उन्मत्त झाला आणि त्याने सर्व देवांना जिंकले. सर्व देव विष्णूला शरण गेले; मात्र विष्णूचाही पराभव झाला. मग सर्व देव गणपतीला शरण गेले. गजाननाने मोरावर बसून सिंधूशी युद्ध करून त्याचा वध केला. तेव्हापासून मोरगावच्या गजाननाचे नाव मयूरेश्वर पडले.
  • मंदिराबद्दल : आदिलशाही पद्धतीचे बांधकाम असलेले हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या सभोवताली पक्का तट बांधण्यात आला आहे. आवारात भव्य अशा पाच दीपमाळा आहेत. सभामंडपात आठ दिशेला गणपतीची विविध रूपे दाखविणाऱ्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाजूला असलेले धर्मंडप, अर्थंडप, काममंडप, मोक्षमंडप आणि चतुद्वार रचना हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
  • अंतर : पुण्यापासून 70 कि. मी., बारामतीपासून 35 कि. मी.
  • स्थान : तालुका - बारामती, जिल्हा - पुणे.
Powered By Sangraha 9.0