पुणे, 17 सप्टेंबर (आ.प्र.) ;
‘जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. भारत या नावाला एक महत्त्व आहे. ते नाव प्राचीन, आपल्या संस्कृतीला अनुसरून आहे,' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीनदिवसीय राष्ट्रीय बैठक पार पडली. या बैठकीविषयी संघाचे सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य आणि प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या ‘भारत' आणि ‘इंडिया' या दोन नावांवर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या संदर्भात विचारले असता डॉ. वैद्य यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. भारत नावाला एक महत्त्व आहे.
ते नाव प्राचीन असून सभ्यता, चिंतन याच्याशी जुळते. या नावासाठी आम्ही पहिल्यापासून आग्रही राहिलो आहोत.' राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात ते म्हणाले, ‘मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, मंकर संक्रांतीनंतरच्या चांगल्या तीथीवरील मुहूर्तावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सनातन धर्मावर केल्या जाणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. कोणताही शब्दप्रयोग करताना त्या शब्दाचा अर्थ माहिती असणे गरजेचे आहे. सनातन या शब्दाचा अर्थ माहिती नसलेले सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करीत आहेत. भारताची ओळख ही अनादी काळापासून अध्यात्मिक अशी आहे. त्यामुळे अनेक राजवटी आल्या, तरीही ते टिकून राहिले आहे.' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनिक, साप्ताहिक, मासिक वर्गणी भरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत वाढ झाल्याचे डॉ. वैद्य यांनी नमूद करताना आकडेवारी सादर केली. पुढील काळात संघाच्या कार्यात नव्याने सहभागी होणाऱ्यांना संघाची विचारसारणी समजून सांगितली जाणार आहे. समविचारी असणाऱ्या विविध क्षेत्रांतील नागरिकांशी संवाद साधून मार्ग काढला जाईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या राष्ट्रीय बैठकीला संघाशी संलग्न 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यात 30 महिला देखील होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुढील काळात महिलांचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक, वैद्यकीय, शिक्षण, आर्थिक अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांचे संमलेन आयोजित केले जात आहे. आजपर्यंत झालेल्या साठहून अधिक संमेलनांत एक लाखाहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. पुढील काळात आणखी 411 संमेलने आयोजित केली जाणार आहेत.