पुणे, 17 सप्टेंबर (आ.प्र.) :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टच्या 131व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला (मंगळवार, 19 सप्टेंबर) सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ‘श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा होईल. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मंगळवारी प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठला मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून ‘श्रीं'ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी फुलांचा आकर्षक रथ तयार करण्यात आला असून, श्री हनुमानाच्या 4 मूर्ती रथावर आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सव मंडपात दुपारी 12 पासून भाविकांनी ‘श्रीं'च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. सायंकाळी सजावटीच्या उद्घाटनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहितीही ट्रस्टकडून देण्यात आली. पुढील वर्षी अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर दगडूशेठ ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे.
मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच आहे. प्रतिकृतीत 24 खांब व 24 कमानी उभारण्यात आल्या आहेत. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून, ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस आहेत. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात आला आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी सजावटीचे, तर वाईकर बंधूंनी विद्युत रोषणाइचे काम केले असून, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे. बुधवारी (20 सप्टेंबर) पहाटे सहाला ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 31 हजार महिला सामुदायिक अर्थवशीर्ष पठण करणार आहेत.
याशिवाय उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. रोज पहाटे 5 पासून महाअभिषेक होणार असून, सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत मिलिंद राहुरकर शास्त्री गणेशयाग आणि दुपारी 1 ते 5 या वेळेत दाक्षिणात्य पद्धतीने लक्षअर्चनासहित नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात 3 ठिकाणी सुसज्ज अशी 24 तास मोफत वैद्यकीय मदत केंद्रे असणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेसह कँटोन्मेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी 50 कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे.
यात चेंगराचेंगरी, दहशतवादी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास प्रतिव्यक्ती 5 लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस 50 हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. 19 ते 29 सप्टेंबरपर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे. ‘श्रीं'चे ऑनलाइन दर्शन घेण्याची व्यवस्थादेखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाइट, ॲप, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे www. dagdushethganpati.com, http:// bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_ iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टने केले आहे.