गणेशोत्सवात सात हजार पोलिस तैनात

    16-Sep-2023
Total Views |
 
police
 
 
पुणे, 15 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, उत्सवाच्या काळात अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 19 ते 29 सप्टेंबर दरम्यान शहरात गणेशोत्सव साजरा होत आहे. मागच्या महिन्यात कोथरूड परिसरातून दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. संभाव्य दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून, उत्सवाच्या काळातील दहा दिवस शहर तसेच उपनगरांत पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. उत्सवाच्या काळात गर्दीचे नियोजन तसेच संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखा पोलिस उपायुक्तांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.
 
उत्सवात शहरात विशेषत: मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात पुणे पोलिस आयुक्तालयातील 5 हजार पोलिस कर्मचारी, अधिकारी, शीघ्र कृती दल, गु्‌‍न्हे शाखेची पथके, बाहेरील जिल्ह्यातील 1 हजार 300 पोलिस अंमलदार, 1 हजार होमगार्ड, सीआरपीएफच्या 5 तुकड्या आणि पोलिसमित्र असे बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची पथके शहरातील संवेदनशील ठिकाणे तसेच गर्दीच्या भागांत साध्या वेशात गस्त घालणार आहेत. बाँबशोधक नाशक पथकाकडून मध्य भागातील मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळांच्या परिसरात नियमित तपासणी करण्यात येणार आहे. उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर : मध्य भागातील प्रमुख मंडळांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
शहर परिसरात वेगवेगळ्या भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर लक्ष ठेवण्यात येईल. गर्दीतील चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी साध्या वेशात गस्त घालणार आहेत. गणेशोत्सवात गणेशभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीचे नियोजन तसेच संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. यान कालावधीत वाहतूक नियोजनासाठी वेगळा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.