राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतून इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. मातृभाषा महत्त्वाची असून, जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजीलाही महत्त्व देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.अल्पबचत भवन येथे आयाेजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बाेलत हाेते.कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतारे आदी उपस्थित हाेते.पवार म्हणाले, शिक्षकांच्या समस्या साेडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. शिक्षकांनी चांगली कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करावे.
विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा उत्तमरीतीने शिकविता यावी यासाठी ती भाषा आत्मसात करावी आणि चांगले उपक्रम राबवावेत.काैशल्याचे आणि नैतिकतेचे शिक्षण देऊन विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत आणि चारित्र्यसंपन्न व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.पालकमंत्री पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धाेरणाची पुढील वर्षापासून 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे.परंपरागत शिक्षणपद्धतीत राेजगार देण्याची क्षमता आणि विद्यार्थ्यांच्या संशाेधक वृत्तीला कमी वाव हाेता. नव्या शैक्षणिक धाेरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे.
शैक्षणिक धाेरणाची अंमलबजावणी करताना पुढील वर्षापासून पहिलीच्या आधीची तीन वर्षे महत्त्वाची मानली जाणार आहेत. या तीन वर्षांत मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर आहे. शिक्षणाच्या माध्यमातून परंपरेविषयी अभिमान निर्माण व्हावा असा प्रयत्न आहे.उपमुख्यमंत्री पवार आणि पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनाही या वेळी पुरस्कार देण्यात आले.