राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाच्या अंमलबजावणीत सुकाणू समितीचे याेगदान महत्त्वपूर्ण

    03-Aug-2023
Total Views |

education
राज्यात नवीन शैक्षणिक धाेरणाच्या गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रम आराखड्यांत या समिती सदस्यांचे याेगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.सुकाणू समिती सदस्यांची पहिली बैठक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे, सहसचिव इम्तियाज काझी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण संचालक सूर्यवंशी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी, शिक्षण संचालक (याेजना) महेश पालकर, परीक्षा परिषदेचे अध्यक्षनंदकुमार बेडसे,
 
राज्य शिक्षण संशाेधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक माधुरी सावरकर, उपसंचालक बेलसरे, आवटे, पाठमाेरे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित हाेते.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण; तसेच प्राैढ शिक्षणाचे अवलाेकन करून त्यानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती केली जाईल. यासाठी शिफारस करण्याच्या अनुषंगाने विविध समित्या व उपसमित्या निवडण्यास; तसेच विषयनिहाय अभ्यास मंडळ रचनेस सुकाणू समितीने मान्यता दिली. या अनुषंगाने तयार करण्यात येणाऱ्या समित्यांत अनुषंगिक विषय तज्ज्ञ, राज्यस्तरावर गाैरवण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका, बालमानसशास्त्र तज्ज्ञांचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना सुकाणू समिती सदस्यांनी केल्या. त्यांना केसरकर यांनी मान्यता दिली.