आत्मयाचा ठाई काही । बद्ध माेक्ष दाेनी नाही ।।2।।

20 Jul 2023 12:30:54
 
 

saint 
 
आणि या सर्वांहून विशाल आणि ज्याला काेणतीही मर्यादा किंवा उपाधी नाही ते चिदाकाश आहे. त्याचप्रमाणे सर्व उपाधीहून वेगळे निर्मळ, विमळ आणि अमर्यादित असे जे परब्रह्माचे स्वरूप आहे त्याला निर्मळात्मा, परेश आणि परमेश्वर म्हणतात.अर्थात ही चारही आकाशे वेगवेगळी वाटली तरी त्यांचे मूळ व्यापक स्वरूप चिदाकाश हे एकच आहे.त्याचप्रमाणे ही परब्रह्माची चारीही रूपे वेगळी वाटली तरी ती मुळामध्ये एकाच परमेश्वराची रूप आहेत, हे महत्त्वाचा निष्कर्ष आणि सूत्र चित्तामध्ये घट्ट धरून ठेवले पाहिजे.असा हा आत्मा स्वानंदाने परिपूर्ण आहे. मनुष्य देहाच्या आधीन जाऊन एकदेशी म्हणजे एकारलेला संकुचित वृत्तीचा अहंकारी बनताे. देहाशी एकरूप झाल्यामुळेच त्याला जन्मांच्या आवर्तात सापडायला लागते. परंतु जाे विवेक आणि वैराग्य यांच्या याेगाने स्वत:च्या आत्मरूपास ओळखताे ताे जीवनाअंती माेक्ष पावून पुन्हा जन्ममृत्यूच्येऱ्यात सापडत नाही.
 
स्वप्नामध्ये एखाद्याला आपण बंधनात सापडलाे आहाेत असे वाटते; पण ताे झाेपेतून जागा झाला की, स्वप्न संपून आपाेआपच बंधनातून मुक्त हाेताे. अगदी त्याचप्रमाणे शरीर म्हणजे मी नाही तर मी म्हणजे आत्मा आहे, असे विवेकाने जाे जाणताे ताे सर्व बंधनातून मुक्त हाेऊन माेक्षाला प्राप्त हाेताे. अर्थात हा आत्मरूपाचा विचार करतानाही माणसाने आपल्या प्रपंचातील कर्तव्याकडे पाठ िफरविता कामा नये.पूर्ण प्रयत्नाने ती कर्तव्ये पार पाडलीच पाहिजेत, असे सांगून या माेक्ष लक्षण समासाची समाप्ती श्रीसमर्थ एका महत्त्वाच्या सूत्राने करतात. ते म्हणतात की, आत्मा हा नित्यमुक्तच असताे. त्यामुळे बद्ध आणि माेक्ष असे द्वैत आत्म्याला अजिबात नाही. त्याचप्रमाणे जन्म आणि मृत्यू हे सुद्धा केवळ शरीराचे असतात. आत्मा चिरंतन अविनाशी असल्याने त्याला जन्म आणि मृत्यूही नाही. ताे सदैव स्थिर निरंजन आहे!
Powered By Sangraha 9.0