प्राचीन काळी श्रृंगमुनींनी वसविल्यामुळे श्रृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगांव म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील सुप्रसिध्द शिवमंदिरामुळे या गावास शिवगांव असेही म्हणत. या शिवगावाचे पुढे शेगांव असे नामकरण झाले. शेगांव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली, तरीही आज मात्र हे ओळखले जाते ते संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण अतिशय भक्तिमय बनून गेले आहे. महाराजांच्या समाधिस्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून, त्याची व्यवस्था तेथील गजानन महाराज संस्थान पाहते.तेथील संस्थानाच्या भक्त निवासमध्ये अल्प दरात मुक्कामाची साेय आहे. या संस्थानातर्फे सेवार्थ बससेवा,निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भाेजन व्यवस्था, विविध वैद्यकीय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात.
सेवार्थ बसमधून आनंदसागर प्रकल्प पाहायला जाता येते. 350 एकरमध्ये माेठ्या तळ्याभाेवती हा प्रकल्प असून, 120 एकरांत पूर्ण झाला आहे. प्रकल्पाचा विस्तार पाहता प्रवेशशुल्क नाममात्र आहे.या प्रकल्पात सुरवातीलाच श्री गजानन महाराज व 18 प्रांतातील 18 संतांचे अत्यंत रेखीव पुतळे आहेत. येथे मुलांसाठी अत्यंत आधुनिक घसरगुंड्या, झाेके, चक्र असे अनेक खेळ चांगल्या स्थितीतआहेत.सर्वत्र निरनिराळ्या प्रकारची झाडे, फुले यांच्या नयनरम्य रचना आहेत.द्वारकाबेटावर जाण्यासाठी झुलता पूल, बदके, कानांना तृप्त करणारे संगीत यांची मेजवानी हाेती, तर ध्यानमंदिरात अत्यंत शांतता असते. असे हे शेगांव मन प्रसन्न करणारे आणि ऊर्जा देणारे केंद्र आहे.