पिंपरीतील नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी दरवाढ

    08-Jun-2023
Total Views |
 
theater
 
पिंपरी, 7 जून (आ.प्र.) :
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी दरवाढ केली आहे. या नवीन दरांची 1 जुलै 2023 पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. कामगारनगरी, औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या शहरात सांस्कृतिक चळवळ रुजत असतानाच या केलेल्या भरमसाट दरवाढीमुळे सांस्कृतिक चळवळीला खो बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि निगडी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर अशी पाच नाट्यगृहे महापालिकेने उभारली आहेत. या नाट्यगृहांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
 
खासगी सभागृहांपेक्षा वाजवी दर आहेत. त्यामुळे या नाट्यगृहात व्यावसायिक नाटक, राजकीय कार्यक्रम, शैक्षणिक संस्थेचे स्नेहमेळावा, इतर मेळावे, समारंभ, स्पर्धा, खासगी कार्यक्रम होत असतात. खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे कारण देत महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ केली. लांडगे नाट्यगृहाचे दर 2012, अत्रे रंगमंदिराचे 2002, तर निळू फुले रंगमंदिराचे दर 2017 पासून सुधारित करण्यात आलेले नाहीत. नाट्यगृहाचे वर्षाकाठी 50 ते 60 लाख उत्पन्न आहे. तर, 1 कोटी खर्च होत आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाड्यात 17 वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून नाट्यगृहांचे भाडेदर सुधारित केले आहेत. सुधारित दराची अंमलबजावणी 1 जुलै 2023 पासून केली जाणार आहे.
 
पूर्वीचे दर : अंकुशराव लांडगे नाट्यगृहात संगीत तालमीसाठी दोन तासांकरिता 787, बाल नाट्यासाठी 1180, तीन तासांच्या नाटकासाठी 3424, इतर कार्यक्रमांसाठी 6686 रुपये दर होते. पाच तासांसाठी 13 हजार 371, आठ तासांसाठी 19 हजार 944, दहा तास 26 हजार 629, 12 तास 33 हजार 202 आणि 15 तासांसाठी 39 हजार 776 दर होते. अत्रे रंगमंदिरातील दोन तासांच्या रंगीत तालमीसाठी 533, बालनाट्य 768, तीन तासांसाठी 1830, ऑर्केस्ट्रासाठी 3776, पाच तास 7494, सात तास 11 हजार 210, दहा तास 14 हजार 928, 12 तास 18 हजार 644, 15 तासांसाठी 22 हजार 362 असे दर होते. निळु फुले रंगमंदिरात तालमीच्या दोन तासांसाठी 1298, बालनाट्य 1947, तीन तासांच्या नाटकासाठी 5487, इतर कार्यक्रमासाठी 10 हजार 561, पाच तासांसाठी 21 हजार 181, आठ तास 33 हजार 453, दहा तास 42 हजार 185, 12 तास 50 हजार 681 आणि 15 तासांसाठी 62 हजार 835 रुपये भाडे होते. तर, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील दोन तासांसाठी 531, बालनाट्य 944, मराठी, सुगम शास्त्रीय संगीताच्या तीन तासांसाठी 2537, ऑर्केस्ट्रॉसाठी 4838, पाच तासांसाठी 9558, आठ तास 14 हजार 278, दहा तास 18 हजार 118, 12 तास 23 हजार 718, 15 तासांसाठी 24 हजार 438 रुपये भाडे होते.
 
नवीन दरवाढ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील वातानुकूलित यंत्रणेसह मुख्य सभागृहासाठी तिकीट दर नसलेली मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी आठ हजार, तिकीट असलेल्या कार्यक्रमांसाठी 12 हजार रुपये दर आहे. शाळांसाठी तीन तासांकरिता 30 हजार रुपये, महाविद्यालयांसाठी पाच तासांकरिता 48 हजार आणि इतर संस्थांसाठी 60 हजार रुपये दर असणार आहेत. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, आचार्य अत्रे सभागृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेसह मोफत मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी सात हजार 200, तिकीट असलेल्या कार्यक्रमांसाठी दहा हजार 800, शाळांना तीन तासांसाठी 27 हजार, महाविद्यालयांना पाच तासांसाठी 43 हजार 200 रुपये, इतर संस्थांसाठी 54 हजार रुपये भाडे असणार आहे. नाट्यगृहात रंगीत तालीम, सरावासाठीचे दर कमी असणार आहेत. गदिमा नाट्यगृह भाडेतत्त्वावर देणार निगडी प्राधिकरणात 66 कोटी रुपये खर्च करून उभारलेले निगडी, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (गदिमा) नाट्यगृह भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे. हे नाट्यगृह भाडेतत्त्वावर देण्याची मागणी नागरिकांकडून ‌‘अ' क्षेत्रीय कार्यालयाकडे केल्याचा दावा पालिकेने केला आहे. हे नाट्यगृह भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
 
 
नाट्यगृह उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही. सांस्कृतिक भूक अतिशय महत्त्वाची आहे. नाट्यगृहाचे भाडे लोकांना परवडेल एवढेच असावे. तज्ज्ञ लोकांशी चर्चा करूनच दरवाढीबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. प्रशासकांनी तुघलकी निर्णय घेऊ नयेत.                                                              -भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा
 
 
नाट्यगृहांचे भाडे खूप कमी होते. त्यामुळे लोकांना आवश्यक सोईसुविधाही मिळत नव्हत्या. अनेक वर्षांनी भाड्यात वाढ केली आहे. मराठी नाटके, प्रयोग, शाळांच्या कार्यक्रमासाठी दर कमी ठेवले आहेत. इतर संस्थांची, उद्योजकांची भाडे भरण्याची क्षमता आहे. त्यांनी क्षमतेनुसार भाडे भरलेच पाहिजे.
                                                                                                                  -शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवडमहापालिका