विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती

08 Jun 2023 16:23:36
 
suresh
 
पुणे, 7 जून (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. सुरेश गोसावी यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस यांनी प्रा. सुरेश गोसावी यांची नियुक्ती जाहीर केली. त्यामुळे साधारण एक वर्षानंतर पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत. प्रा. गोसावी यांच्यापुढे अभ्यास मंडळावरील नियुक्त्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्राध्यापकांची पदे भरणे, चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करणे असे अनेक प्रश्न आहेत. प्रा. गोसावी यांना शिक्षण क्षेत्रात कामाचा 35 वर्षांपासून अधिक अनुभव आहे. मूळचे धामणगाव (जि. जळगाव) असणाऱ्या प्रा. गोसावी यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जळगाव जिल्ह्यात पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी 1988 मध्ये पुणे विभागाच्या भौतिकशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
 
पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1992 मध्ये एसपी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनाला सुरुवात केली. त्यानंतर 1996 मध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. साधारण 1998 ते 2000 या कालावधीत त्यांनी अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिप केली. भौतिकशास्त्र विभागात त्यांनी 2004 पासून सेवेला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर गेल्या वर्षी 18 मे रोजी निवृत्त झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार सोपवला. त्यानंतर आतापर्यंत विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नव्हते. त्यामुळे दूरगामी परिणाम करणारे शैक्षणिक धोरण राबविण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर कुलगुरू निवड समितीने राज्यपाल बैस यांच्याकडे दिलेल्या पाच नावांपैकी एकाची निवड करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून नेमणूक झाल्याने आनंदित आहे. पुणे विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाची शैक्षणिक संकुल आणि संलग्न महाविद्यालयात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे. विशेषकरून प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांमध्ये धोरणाची अंमलबजावणी करण्यावर लक्ष देणार आहे. पुणे विद्यापीठाची नॅशनल इन्स्टिट्यूटशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) शैक्षणिक गुणवत्तेत झालेली पडझड सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे विद्यापीठाची रँकिंग पूर्ववत करण्यावर माझा फोकस राहणार आहे -प्रा. सुरेश गोसावी (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
Powered By Sangraha 9.0