बालभारती-पौड फाटा रस्त्याला एकही जोडरस्ता नाही

    07-Jun-2023
Total Views |
 
baal
 
पुणे, 6 जून (आज का आनंद न्यूज नेटवर्क)
 
सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रस्ता बांधकाम व्यावसायिकांसाठी केला जात असल्याचा आरोप केला जात असला, तरी प्रत्यक्षात या 1.7 किलोमीटरच्या रस्त्याला एकही जोडरस्ता नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. ज्या सर्वे क्रमांक 44 साठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला जात आहे, त्या स.नं 44 च्या अर्ध्या भागात हा रस्ता तब्बल 25 फूट उंच (उन्नत) आहे. या उन्नत रस्त्याला कुठेही रॅम्प नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे; तसेच उर्वरित भागात जिथे रस्ता पौड रस्त्याला जोडला जातो तिथे डोंगराचा ओबडधोबड भाग असून, तो कुठेही या सर्वे क्रमांकाला जोडणेच शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पूर्वी या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर महापालिकेने याबाबत खुलासा केल्यानंतर आता बांधकाम व्यावसायिकांसाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
 
त्याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, या रस्त्यावर कुठेही जोडरस्ता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. महापालिकेचा हा प्रस्तावित रस्ता 1.7 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील 700 मीटर रस्ता जमिनीवरून असून, बालभारतीसमोरून ते विधी महाविद्यालय रस्त्याच्या बाजूला असलेल्या कांचन गल्लीपर्यंत हा रस्ता जमिनीवरून असणार असून, कांचन गल्लीपासून तो इलिवेटेड् (उन्नत) असणार आहे. तो थेट सर्वे क्रमांक 44 च्या अर्ध्यापेक्षा अधिक भागात या रस्त्यांची उंची जमिनीपासून 8 मीटर (24 ते 25 फूट) असणार आहे. त्यानंतर पुढे हा रस्ता पौड रस्त्याच्या बाजूला उतारावर असणार असून, हा भाग टेकडीच्या तीव्र उतरावर तसेच ओबडधोबड रस्त्याने रस्ता उंचीवरच असणार आहे. त्यामुळे या भागातील कोणत्याही बांधकाम व्यावसायिक अथवा महापालिकेचे आरक्षण असलेल्या एसआरए प्रकल्पाच्या जागेसही तो जोडलेला असणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.