मावळच्या कुंडमळ्यातील बंधारा अपघातांचा ब्लॅक स्पॉट

    07-Jun-2023
Total Views |
 
black
 
पिंपरी, 6 जून (आ.प्र.) :
 
मावळ तालुक्यातील शेलारवाडीजवळ कुंडमळ्यात असलेल्या बंधाऱ्यावरून जाणाऱ्या वाहनांचे सातत्याने अपघात होत आहेत. 10-12 किलोमीटर अंतराचा वळसा न घालण्यासाठी वाहनचालक या अरुंद बंधाऱ्यावरून वाहने चालवतात आणि नियंत्रण सुटल्याने अथवा निसरड्या भिंतीवरून घसरून वाहने थेट पाण्यात पडतात. यामुळे हा बंधारा अपघातांचा ‌‘ब्लॅक स्पॉट' बनला आहे. कुंडमळा ते शेलारवाडी दरम्यान इंद्रायणी नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. या मागणीवरून माजी मंत्री बाळा भेगडे आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणीदेखील केली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या पुलाचे काम करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. मात्र, तो पूल अजूनही कागदावरच राहिलेला आहे. कुंडमळा येथील बंधाऱ्यावरून बारमाही पाणी वाहते. त्यामुळे या बंधाऱ्यावरून ये-जा करणे कायम धोक्याचे असते. दरम्यान, दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या काळात इंद्रायणी नदीवर एक लहान पूल बांधण्यात आला आहे. यावरून पादचारी नागरिक आणि दुचाकीस्वार ये-जा करतात. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर या पुलावरूनदेखील वाहतूक करता येत नाही. गावातील अनेक शेतकऱ्यांची शेते नदीच्या दुसऱ्या दिशेला आहत. त्यामुळे नदीला पाणी आल्यास या शेतकऱ्यांची देखील मोठी गैरसोय होते.
 
 
वारंवार होतात अपघात :
 
सोमवारी (दि. 5) सकाळी या बंधाऱ्यात एक छोटा टेम्पो घसरून पडला. चालक वेळीच बाहेर पडल्याने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 26 मे रोजी एक कार बंधाऱ्यात पडली. याबरोबरच ट्रॅक्टर, जीप, बैलगाडी आणि कारचे इथे वारंवार अपघात झाले आहेत. बाणेर येथील एक महिला कारमधून या बंधाऱ्यावरून जात असताना तिची कार पाण्यात पडली. त्यात ती महिला मृत्युमुखी पडली होती. बैलगाडी पाण्यात पडल्याने पशुधन आणि शेतमालाचे देखील नुकसान होत आहे.
 
शॉर्ट कट म्हणून वापर :
 
शेलारवाडी, कान्हेवाडीतर्फे चाकण या गावातील नागरिकांना तळेगाव, घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराकडे जाण्यासाठी इंद्रायणी नदीवरील मार्ग नागरिकांना जवळचा वाटतो. दुसऱ्या मार्गाने जायचे झाल्यास तब्बल 10 ते 12 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. हा वळसा वाचविण्यासाठी दुरवस्था झालेल्या बंधाऱ्याच्या कठड्यावरून वाहने नेली जातात. नागरिक जीवाचा धोका पत्करून या मार्गाने प्रवास करीत आहेत.