भाजपने गेली नऊ वर्षे तळागाळासाठी काम केले : प्रल्हादसिंह पटेल

    07-Jun-2023
Total Views |
 
9
 
पिंपरी, 6 जून (आ.प्र.) :
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांतील सत्ताकाळात घेतलेले महत्त्वाकांक्षी निर्णय, समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या विविध योजना आणि विकासकामे यांचे रिपोर्ट कार्ड आम्ही नागरिकांच्या समोर ठेवले आहे. त्यावर समीक्षा आणि समर्थनसुद्धा करावे, अशी भावना मोदी सरकारची आहे, असे मत केंद्रीय खाद्य प्रसंस्करण उद्योग तथा जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मोदी 9 जनसंपर्क अभियान अंतर्गत संपर्क से समर्थन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी ओडिशा येथील रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय टंडन, शिरूर लोकसभा प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार उमा खापरे, माजी आमदार जयश्री पालांडे, भाजपा पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे, संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, अमोल थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय टंडन म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात भारताने जगभरातील देशांना लस पुरवठा केला. पूर्वी टीबीच्या लसीसाठी आपल्या देशाला 27 वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. यासह अनेक टप्प्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याचा लेखाजोखा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रतिष्ठित लोकांच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हाच संपर्क से समर्थन अभियानाचा उद्देश आहे.
 
नैसर्गिक आपत्ती ही कुणाच्याही नियंत्रणात नाही. मात्र, या आपत्तीच्या काळात आपण मदतकार्याचे नियोजन कसे करतो, हे महत्त्वाचे आहे. संपूर्ण जग हा एक परिवार आहे, अशा भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. नागरिकांनी या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. - संजय टंडन, सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी, भाजप