पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा का येताे?

    06-Jun-2023
Total Views |


Relation


आळशीपणा : एकमेकांच्या प्रेमात असतानाचे साेनेरी दिवस आठवून बघा. किती वेळ दिला जायचा? ताे किंवा ती आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत? हे वारंवार जमेल त्या प्रत्येक पद्धतीने पटवून देण्याचा आपला प्रयत्न असायचा.संसाराच्या रहाटगाड्यात मात्र आपण इतके गुंतून जाताे की, साथीदाराविषयीच्या भावना व्यक्त करण्याचा कंटाळा करायला लागताे. हे चुकीचे असून मनातल्या भावना आजही पूर्वीप्रमाणेच वेळाेवेळी व्य्नत करायला हव्यात. कधीतरी स्वतःहून आपल्या साथीदारासाठी काहीतरी प्लॅन करायला हवे. महिन्यातून एखादा चित्रपट, आठवड्यातून एखादवेळी सरप्राईज डिनर, अनपेक्षित दिलेली एखादी भेटवस्तू, दिसण्याचे केलेले
काैतूक या आणि अशाच काही गाेष्टी नाते टवटवीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

संशयी वृत्ती : आपला नवरा किंवा बायकाे जर सतत लॅपटाॅप किंवा माेबाईलवर वेळ घालवत असेल तर मनात शंका येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी ताे किंवा ती कुणाला व काय मॅसेज करतात यावर लक्ष ठेवण्याची अनेकांची प्रवृत्ती असते. नेमकी हीच प्रवृत्तीनात्यातला विश्वास गमावण्यास पुरेशी ठरते.कारण बरेचदा आपली शंका म्हणजे निव्वळ आपला भ्रम असताे. त्यामुळे प्रेमाच्या नादात आपण आपल्या साथीदाराचे स्वातंत्र्य तर हिसकावून घेत नाही ना हे पडताळून पाहावे. अन्यथा नाते घुसमटून संपण्याची शक्यता असते.

लग्नाआधीचे संबंध : लग्नापूर्वी जर त्याचे किंवा तिचे कुणाशी प्रेमसंबंध असतील तर लग्नानंतर ते कटाक्षाने टाळावेत. जर त्याबाबत तुमच्या साथीदाराला माहिती असेल व काही हरकत नसेल तर निर्मळ मैत्री ठेवता येईल; पण त्यापुढे जाऊन मर्यादा साेडून वागणे चुकीचे आहे. नवरा-बायकाेचे नाते अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे निभवावे लागते.