असा जन्मला कांतारा!

03 Jun 2023 16:04:01
 
 

Kantara 
 
कांतारा हा उत्पन्नाचे अनेक विक्रम करणारा कन्नड सिनेमा हिंदीतही तुफान चालला. त्यातल्या ग्रामदैवताचं रंगरूप, त्याची ती आराेळी, सिनेमाला असलेली एक फँटसीची झालर या सगळ्यामुळे हा सिनेमा देशभरात लाेकप्रिय झाला. या सिनेमाचं कथानक जन्माला कसं आलं, याची गंमत अभिनेता, लेखक, दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याने एका मुलाखतीत सांगितलं. काेविडकाळातल्या दुसऱ्या लाॅकडाऊनच्या वेळी ऋषभला वाटत हाेतं की आता असेच लाॅकडाऊन लागत राहणार, सिनेमा बनवणं, रिलीज करणं हे काही हाेणार नाही अनेक वर्षं.आपण शेती करावी.
 
मंगलाेर परिसरात त्याची जमीन आहे. ताे त्यासंदर्भात तिथे गेला हाेता, मित्रांशी बाेलत हाेता. तेव्हा त्याला डुकराच्या शिकारीची एक मजेशीर कथा कळली. एका मित्राच्या शेताचं रानडुकरानं नुकसान केलं, त्याने त्या रानडुकराची शिकार करायचं ठरवलं. लायसन्स असलेली बंदूक घेऊन त्याने पाच वेळा केलेला प्रयत्न फसला. दरम्यान वनखात्यात काेणी कळवलं आणि बेकायदा शिकार करत असल्याबद्दल त्याची ती बंदूक जप्त केली गेली.ती रिकामी करण्यासाठी आकाशात नेम धरून गाेळीबार करत असताना बॅकफायर हाेऊन वनअधिकाऱ्याला इजा झाली. इथे जमिनीवरून संघर्ष हे सिनेमाचं बीज पडलं. कर्नाटकाच्या किनारी भागातल्या, शेतकऱ्यांमधल्या अनेक लाेककथांचा, लाेकपरंपरांचं खत त्या बीजाला मिळालं आणि हा अनाेखा सिनेमा तयार झाला.
Powered By Sangraha 9.0