अहमदनगरला अहिल्यादेवी हाेळकर यांचे नाव देणार

02 Jun 2023 19:04:13
 
 

Ahamadnagar 
 
पुण्यश्लाेक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी देशाला प्रशासकीय संरचनेची माेठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी हाेळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घाेषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान माेठा हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.चाैंडीत (ता. जामखेड) पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयाेजिण्यात आला हाेता. त्यात मुख्यमंत्री बाेलत हाेते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लाेखंडे, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार माेनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गाेपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकासमहात्मे, माजी आमदार भीमराव धाेंडे, अण्णासाहेब डांगे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढाेबळे, पाेपटराव गावडेआदी उपस्थित हाेते.
 
पुण्यश्लाेक अहिल्यादेवींनी न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम केले.अहिल्यादेवींचे राज्य परिवर्तनवादी व पुराेगामी हाेते. त्यांनी त्या काळात राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबराेबरच हुंडाबंदी, मद्यबंदीबाबत जागृतीचे काम केले. देशभरातील विविध मंदिरांचा जीर्णाेद्धार केला, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. विखे पाटील, पडळकर यांचीही मनाेगत व्यक्त केले.यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, परिसरात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीची मान्यवरांनी पाहणीही केली.
Powered By Sangraha 9.0