वय काय, बुद्धी किती, बाेलताेस किती?

    01-Jun-2023
Total Views |

joke
 
आजकालची मुलं स्मार्ट आहेत, लहान वयात खूप गाेष्टी त्यांना माहिती असतात. आदल्या पिढीपेक्षा पुढची पिढी नेहमीच स्मार्ट असते, हे सगळं खरं आहे. पण म्हणून एखादी चार वर्षांची मुलगी एखादं लावणीनृत्य नक्कल म्हणून सगळ्या शृंगारिक अदांसह सादर करत असेल (आपल्या संस्कारी समाजात लहान मुलांना हे करायला लावणारे आईबाप असतात, त्यांचे कार्यक्रम बनवणारे चॅनेल असतात, ते चवीने पाहणारे प्रेक्षक असतात), तर त्या मुलीला शृंगार म्हणजे काय, त्या अदाकारीचा अर्थ काय, ते सगळं कळतंय, असं गृहीत धरता येईल का? ती मुलगी पाठांतरपटूआहे उत्तम इतकंच.
 
तीच गत या बालपुढारी नामक मनाेरंजक चिरंजीवांची. हा पुढाऱ्यांच्या थाटात बाेलताे लहानपणापासून. तेव्हाच आईवडिलांनी याेग्य संस्कार करून त्याला या वाईट सवयीपासून वाचवायला हवं हाेतं. पण, त्यातून प्रसिद्धी मिळू लागली आणि चिरंजीव चेकाळले. आता हा मुलगा गाैतमी पाटील या नृत्यांगनेला महाराष्ट्राची संस्कृती शिकवताे आहे, तिने वेळेत वर्तन सुधारलं नाही तर धडा शिकवण्याची भाषा करताे आहे. ते पाहून लाेक काय प्रकारच्या कमेंट करतात, ते पाहा. अर्थात, त्याच्या बातम्या देणारी आणि त्याच्यापुढे माइक घेऊन जाणारी माध्यमं आहेत ताेवर त्याला काहीच फरक पडणार नाही. बदनाम सही, नाम ताे हुआ!