पिंपरी, 23 मे (आ.प्र.) :
पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळे नागरिक, पर्यटकांना पाहण्याकरिता पिंपरी चिंचवड दर्शन ही बससेवा 1 मे 2023 पासून सुरू करण्यात आली. मात्र, गेल्या 18 दिवसांमध्ये एकही बुकिंग आले नाही. परिणामी पिंपरी चिंचवड दर्शन बससेवेचा प्रयोग चौथ्यांदा फेल झाला आहे. बुकिंगच होत नसल्याने या सेवेला प्रारंभच होऊ शकला नाही. पिंपरी चिंचवड नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. या नगरीतील धार्मिक स्थळे, मंदिरे, ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे आहे. ती एका दिवसात पाहण्याची सुविधा पीएमपीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीएमपीतर्फे 1 मेपासून पिंपरी चिंचवड दर्शन ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू केली; परंतु या योजनेचा प्रचार-प्रसार करण्यात आलेल्या अपयशामुळे एकही बुकिंग येऊ शकले नाही. ही सेवा सुरू करण्यापूर्वी पर्यटकांपर्यंत या सेवेची माहिती पोहोचविण्यासाठी मोठ्या पातळीवर जनजागृती होणे अपेक्षित होते. या पूर्वी ही बस सेवा 3 ऑगस्ट 2019 पासून सुरू करण्यात आली होती. त्या वेळी एका दिवसाचे तिकीट 700 रुपये होते.
तिकिटाचा दर जास्त असल्याने प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे आले होते. प्रतिसाद न मिळाल्याने तात्पुरत्या स्वरूपात ती सेवा त्या वेळी स्थगित करण्यात आली होती. त्याच्या पूर्वी दोन वेळा ही सेवा सुरू करण्यात आली होती. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. आता 1 मेपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, तिचा प्रारंभच होऊ शकला नाही. 62 किलोमीटरच्या या प्रवासात निगडी, भक्ती शक्ती उद्यान, प्रती शिर्डी शिरगाव, देहूगाव, मुख्य मंदिर, देहू गाथा मंदिर, बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, चापेकर बंधू स्मारक, श्री मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, इस्कॉन मंदिर, अप्पूघर, दुर्गा टेकडी या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड दर्शन बससेवेचे प्रतिप्रवासी 500 रुपये तिकीट दर आहे. ही बस सकाळी 9 वाजता निगडी भक्ती-शक्ती उद्यानातून सुटणार होती व सायंकाळी 7.15 पर्यंत परत येणार होती.
पिंपरी चिंचवड दर्शन बससेवेसाठी सर्व बस वातानुकूलित असणार आहेत. तसेच प्रती शिर्डी शिरगावचा यात समावेश असल्याने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे किमान 500 रुपये तरी तिकीट दर असून, तो जास्त नाही. तसेच बस धावण्यासाठी किमान 25 जणांचे तरी बुकिंग आवश्यक आहे. मात्र, गेल्या 18 दिवसांमध्ये एकही बुकिंग आलेले नाही. पुणे शहरात मात्र या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. -शांताराम वाघेरे, निगडी डेपो मॅनेजर