पुणे, 23 मे (आ.प्र.) :
टपाल खात्याच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या सर्व टपाल कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची व त्यांच्या पाल्यांकरिता विविध प्रकारच्या सांस्कृतिक चाचण्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन पुणे ग्रामीण डाक विभागाच्या वतीने शनिवारी (दि.20) करण्यात आले होते. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांतील टपाल कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निवड समितीमध्ये सहायक अधीक्षक एस.डी. मोरे, शिल्पा गोऱ्हे, रतन कुमार, विकास कुचेकर आदींचा समावेश होता. आर.पी. गोसावी, व्योम कुलकर्णी यांनी पेटी व तबला वादनाद्वारे कार्यक्रमास साथ दिली. प्रवीण यादव यांची एकांकिका, दुर्वा अंबादास उबाळे हिचे भरत नाट्यम्, राजेश रोडे यांचे शास्त्रीय संगीत, विजय गुंजाळ यांचे सुगम संगीत, तसेच सुधीर मुळे यांची लोकगीत सादरीकरणात निवड झाली. अशी माहिती पुणे ग्रामीण विभागाचे डाकघर अधीक्षक बी.पी. एरंडे यांनी दिली.