चपळ आणि तीक्ष्ण नजरेचा चित्ता

    24-May-2023
Total Views |
 
 

cheetah 
 
सिंह, वाघ, बिबळ्या इ. प्राण्यांप्रमाणेच चित्ता हा मार्जारकुलातील एक प्राणी असून त्याचे शास्त्रीय नावसिनाेनिक्स जुबेटस आहे. आफ्रिकेचा बहुतेक भाग आणि भारतात ताे आढळताे. भारताच्या वायव्य दिशेला असलेल्या खिंडींमधून ताे भारतात आला आणि उत्तर व मध्य भारतातील सपाट प्रदेश आणि पायथ्याच्या टेकड्यांत ताे स्थायिक झाला. तेथून ताे दक्षिणेत कर्नाटकापर्यंत पसरला. चित्ता दाट गवताळ रानात राहताे, पण सपाट उघडा प्रदेश त्याला जास्त आवडताे.शिरासह याच्या शरीराची लांबी 1.4-1.5 मी.,शेपटीची लांबी 0.6- 0.75 मी., खांद्यापाशी उंची सु. 1 मी. आणि वजन सामान्यतः 50-65 किग्रॅ. असते. शरीराच्या वरच्या भागाचा रंग पिंगट किंवा फिक्कट पिवळा आणि खालच्या भागाचा पांढरा असताे. सगळ्या अंगावर दाट काळे ठिपके असतात.
 
त्याप्रमाणेच प्रत्येक बाजूला डाेळ्यापासून निघून ताेंडापर्यंत गेलेला एक काळा पट्टा असताे. चित्त्याचे पाय बरेच लांब असतात;डाेके लहान व वाटाेळे असते; कान लहान असतात; डाेळ्यातील बाहुली वाटाेळी असते. पायावरील नख्या बाेथट, किंचित वाकड्या व अंशतः प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणाऱ्या) असतात; त्यांच्यावर आवरण नसल्यामुळे त्या उघड्या असतात.चित्त्याचे मुख्य भक्ष्य कुरंग आणिइतर लहान हरणे हे हाेय. परंतु सशांएवढे लहान सस्तन प्राणी आणि पक्षीही ताे खाताे. चित्ता वासावरून शिकार करीत नाही, तर स्वत: प्रत्यक्ष पाहून त्याचा पाठलाग करून त्याची शिकार करताे. सामान्यतः दिवसाउजेडीच ताे शिकार करताे, पण चांदण्या रात्रीही ताे शिकारीकरिता बाहेर पडताे.
 
याची शिकार करण्याची रीत काहीशी मांजरासारखी, तर काहीशी कुत्र्यासारखी असते. भक्ष्याचा पाठलाग करताना याचा वेग ताशी सु.72 किमी. असताे आणि ताे 366 मी.अंतरापर्यंत टिकून राहताे. या असामान्य वेगाचे मुख्य कारण म्हणजे हरणांसारखे अतिशय चपळ प्राणी त्याला पकडावयाचे असतात.भारतात अनेक शतके शिकारी लाेकांनी चित्ता माणसाळवून, पाळून त्याला शिकार करण्याचे शिक्षण देऊन शिकारीकरिता त्याचा उपयाेग करून घेतलेला आहे. शिकारी लाेक शिकारीच्या वेळी पाळीव चित्त्यांचे डाेळे बांधून त्यांना बराेबर नेतात. एखादा हरणांचा कळप दुरून येताना दिसला की, चित्त्याचे डाेळे साेडतात व त्याला ताे कळप दाखवितात.अतिशय वेगाने धावून चित्ता आपली शिकार पकडताे. चित्त्याचा गर्भावधी 84-95 दिवसांचा असताे. मादीला एका खेपेला 2-4 पिल्ले हाेतात. चित्ता भारतातून हल्ली पूर्णपणे नामशेष झाला आहे, असे म्हटले जाते.