महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर दाैऱ्यावर आले असता राज्यपालांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पाेलिस अधीक्षक समीर शेख, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गाेष्ट असल्याची भावनाही राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी राज्यपालांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकाचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच, गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयासही भेट दिली.