सततच्या कामाने येणाऱ्या थकव्यावरील काही उपाय

    22-May-2023
Total Views |
 
 work
 
काही मिळवायचे असेल, तर मेहनत करावीच लागते. कमाई कशी करावी याचे मार्ग व्यक्तिगणिक भिन्न असतात. काही कामांमध्ये शारीरिक श्रमांना पर्याय नसताे. औद्याेगिक क्षेत्रात त्याचे प्रमाण जास्त दिसते. ही कामे ‘ब्ल्यू काॅलर जाॅब’ म्हणून ओळखली जातात आणि ती करणारे कामगार आपल्या समाजाचा कणा असतात. हे लाेक आव्हानात्मक स्थितीत दीर्घकाळ श्रम करत असतात. आपली अर्थव्यवस्था सुरळीत चालू राहण्यासाठी ही कामे आवश्यक असली, तरी अतिश्रमांमुळे शारीरिक-मानसिक थकवा येऊन बर्नआउटची स्थिती येते. त्याची कारणे काेणती आणि ती दूर कशी करता येतील याबाबत ‘द यूथ प्लॅटफाॅर्म’च्या सह संस्थापिका आणि ‘इन्व्हेस्ट द चेंज’च्या संस्थापिका क्षवी जिंदल यांनी काही सूचना केल्या आहेत. त्या पाहा.
 
ब्ल्यू काॅलर जाॅबमधील बर्नआउटची कारणे :
 
1) कामाचे दीर्घ तास : ब्ल्यू काॅलर वर्कर्स सहसा अनेक तास काम करतात आणि काही वेळा तर ओव्हरटाइमसुद्धा करतात. उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करणे, हंगामानुसार वाढलेली मागणी अथवा कर्मचाऱ्यांची कमतरता अशी अनेक कारणे त्यामागे असतात. मात्र, कामाच्या या वाढलेल्या तासांमुळे थकवा येताे आणि त्याचा परिणाम व्यक्तिगत आयुष्य आणि कामाचे संतुलन बिघडण्यावर हाेताे.
 
2) शारीरिक श्रम : ब्ल्यू काॅलर जाॅब्जमधील अनेक कामे शारीरिक श्रमांची असतात. उदा. वजनदार वस्तूंची ने-आण, दीर्घकाळ उभे राहून काम करणे अथवा वाईट स्थितीत काम करणे. या श्रमांमुळे शारीरिक दुखापती हाेणे, आजारी पडणे आदी परिणाम हाेऊन थकवा वाढताे.
 
3) नियंत्रणाचा अभाव : आपण काेणत्या स्थितीत आणि काय काम करावे यावर ब्ल्यू काॅलर वर्कर्सचे नियंत्रण नसते. त्यांच्या कामांबाबतचे नियम कडक असतात. या स्थितीत कामगारांना नैराश्य येऊन थकवा वाढताे.
 
4) राेजगाराची असुरक्षितता : या क्षेत्रातील कामगारांना राेजगाराची सुरक्षितता नसते. कधी टाळेबंदी (ले-ऑफ), कधीकामावरून काढले जाणे अथवा अन्य कारणे त्यामागे असतात. राेजगाराच्या असुरक्षिततेमुळे तणाव आणि चिंता वाढतात. राेजगार टिकविण्यासाठी कामगार जास्त वेळ काम करतात आणि त्याचा परिणाम आत्यंतिक थकवा येण्यावर हाेताे.
 
ब्ल्यू काॅलर जाॅब्जमधील बर्नआउटची लक्षणे :
 
1) शारीरिक थकवा : दीर्घकाळ शारीरिक श्रम केल्यामुळे शरीरात वेदना हाेऊ लागतात. ते दुखायला लागते आणि थकवा येताे.
 
2) भावनिक थकवा : कामाच्या श्रमांमुळे भावनिक थकवा येऊन मूड वारंवार बदलायला लागताे.
 
3) नैराश्य : कामगारांना त्यांच्या कामाबाबत आत्मियता वाटेनाशी हाेऊन ते एकमेकांवर टीका करायला लागतात.
 
4) घटती गुणवत्ता : आत्यंतिक थकव्याचा परिणाम कामाची गुणवत्ता घटण्यावर हाेताे.
 
बर्नआउट टाळण्याचे उपाय :
 
1) मदत करणे : आपल्या कामगारांचे मानसिक आराेग्यचांगले ठेवण्यासाठी नियाेक्ते त्यांच्यासाठी समुपदेशनाची व्यवस्था करू शकतात. अन्य समस्या तसेच आर्थिक अडचणींबाबतसुद्धा त्यांना मदत केली पाहिजे.
 
2) ब्रेक आणि विश्रांती : सतत काम करण्याऐवजी कामगारांना मधूनमधून थाेडी विश्रांती घेऊ दिली पाहिजे तसेच त्यांना कामातथाेडा ब्रेकही दिला पाहिजे.
 
3) प्रगतीसाठी उत्तेजन : प्रशिक्षणाद्वारे प्रगतीची संधी कामगारांना दिली पाहिजे.कामाच्या जागी खुले वातावरण तसेच निर्णयप्रक्रियेत कामगारांना सहभागी करून घेण्याचा फायदा हाेताे.
 
4) फायदे देणे : कामगारांना आराेग्यविषयक सुविधा देणे तसेच निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना बचतीला प्राेत्साहन देण्याचे काम नियाेक्ते करू शकतात. राेजगाराबाबतची असुरक्षिततासुद्धा दूर केली पाहिजे.