रस्त्यांच्या निर्मितीचा इतिहास

    19-May-2023
Total Views |
 
 

roads 
 
 
चाकांची वाहने प्रथम वापर पूर्व आशिया मायनरमधील व्हॅन सराेवराच्या आसपासच्या प्रदेशात विकसित झालेली असावीत.सर्वांत जुन्या पुरातत्वीय पुराव्यावरून चाके लावलेले वाहन इ. स. पू. 3000 च्या थाेड्या अगाेदर अस्तित्वात आलेले असावे. यांतील सर्वांत जुन्या काॅकेशस व तार्सस पर्वतांच्या दक्षिणेकडील वन प्रदेशातील सुमेरियन लाेकांनी तयार केलेल्या दाेन चाकी लाकडी गाड्या असाव्यात. डॅन्यूब नदीतून वर व बाल्कन देशांच्या उत्तरेकडे प्रवास करणाऱ्या लाेकांनी चाकांचे वाहन इ. स. पू. 2000 वर्षांपूर्वीच्या काळात पश्चिमेकडे युराेपात नेले असावे.ब्राँझयुगात मनुष्याने घाेडा माणसाळवण्याची सुरुवात केली. घाेडा माणसाळल्याने सुलभ झालेली शेती व व्यापार यांचा विकास मानवी संस्कृतीच्या प्रारंभाचे लक्षण ठरला. व्यापाराकरिता चांगले रस्ते आवश्यक हाेते.
 
मेसाेपाेटेमियातील लाेक हे खऱ्या अर्थाने पहिले रस्ते बांधणारे असावेत.त्यांनी बॅबिलाेनियन साम्राज्यापासून पश्चिम व नैऋर्त्य दिशांनी इजिप्तकडे जाणारे प्रवासी मार्ग विकसित केले. बॅबिलाेन व इतर प्राचीन शहरांतील देवळे व राजवाडे यांना जाेडणारे मिरवणुकीचे रस्ते (इ. स. पू.700 - 600) फरसबंद हाेते व त्यांकरिता भाजलेल्या विटा व दगड बिट्युमेनयुक्त संयाेजकांत बसविलेले हाेते.आधुनिक हमरस्ता प्रणाली ही एक प्राचीन रस्ता प्रणालीच्या नैसर्गिक वाढीतूनच निर्माण झालेली आहे. सर्वांत जुन्या लांब अंतराचा रस्ता हा इराणी शाही मार्ग हाेता.इ. स. पू. 3500 ते 3000 या काळात ताे वापरात हाेता.
 
इराणच्या आखाताजवळील स्यूसा या गावापासून या मार्गाची सुरुवात झालेली हाेती आणि त्याच्या स्यूसा ते स्मर्ना (इझमीर, तुर्कस्तान) या भागाची लांबी सुमारे 2,850 किमी. हाेती.ख्रिस्तपूर्व पहिल्या सहस्रकात भारत व पश्चिम आशियाई प्रदेश यांच्यात व्यापारी संबंध असल्याचे पुरावे मिळतात. ऋतूनुसार विशिष्ट दिशेने नियमित वाहणाऱ्या माेसमी वाऱ्यांच्या शाेधामुळे भारत-पश्चिम आशिया यांदरम्यान अरबी समुद्रामधून व्यापारी जहाजांची ये-जा वाढली.राेमन साम्राज्यकाळातही त्या प्रदेशांशी उत्तर भारताचा खुश्कीच्या मार्गाने, तर दक्षिण भारताचा सागरी मार्गाने व्यापार चालत असल्याचे दाखले मिळतात. आधी पायवाटा आणि मग त्यातून संस्कृती विकासाप्रमाणे रस्त्यांची निर्मिती मानवाने केली. रस्ते प्रामुख्याने व्यापारासाठीच तयार करण्यात आले हाेते. दळणवळणाचा हेतू हा व्यापार हाच हाेता असे दिसते.