डॉ. श्रद्धा पुराणिक
(सल्लागार नेत्रचिकित्सक)
*************************************
पूना हॉस्पिटल
27, अलका थिएटर जवळ
गांजवेवाडी, सदाशिव पेठ
पुणे - 411030.
फोन क्र. : (020) 6609 6000
****************************************************************************************
डोळे आहेत म्हणून आपल्याला हे जग दिसते आणि सर्व कामे होतात. वयाच्या एका टप्प्यानंतर शारीरिक आरोग्याच्या तक्रारी उद्भवू लागतात आणि त्यात डोळ्यांचाही समावेश असतो. त्यांची कशी काळजी घ्यावी, याबाबत नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रद्धा पुराणिक यांनी दिलेला हा महत्त्वाचा सल्ला.
मानवी आरोग्यात वय हा एक महत्त्वाचा घटक असतो. कोणतीही व्यक्ती मध्यम वयाला पोहोचली; अर्थात चाळिशी पार केली की शारीरिक आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी सुरू होतात. त्याला डोळेही अपवाद नसल्यामुळे वयाच्या चााळिशीनंतर नियमितपणे नेत्रतपासणी करून घेणे आवश्यक आहे. या लेखाचा उद्देश तुम्हाला डोळ्यांच्या आरोग्याविषयी सजग करण्याचा आहे. वयाची चााळिशी गाठत असताना बहुतांश वेळा सतावणारा त्रास म्हणजे वाचन करताना अथवा जवळचे काम (उदा. सुईमध्ये दोरा ओवणे किंवा धान्य निवडणे) करताना कमी दिसायला लागणे.

हा एक प्रकारचा physiological अर्थात नैसर्गिक बदल आहे. यात डोळ्यांची जवळची वस्तू केंद्रित करून (focus) बघण्याची शक्ती (accommodation) कमी होते. त्याला presbyopia असे म्हणतात. जवळचे वाचन आणि काम करण्यासाठी plus नंबरचा चष्मा दिला जातो आणि ही तक्रार दूर होते. खूप लोकांना या वयात, विशेषत: आजच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे विकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये डोळ्यांमध्ये लवकर मोतीबिंदू (cataract) होणे, चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे, अचानक डोळे तिरळे होणे, डोळे कोरडे पडणे (dry eye), डोळ्यांच्या पडद्यावर (retina) रक्तस्राव होणे अथवा सूज येणे, काचबिंदू (glaucoma) तक्रारी किंवा विकार उद्भवू शकतात.

उच्च रक्तदाबामुळे डोळ्याच्या पडद्यात बदल होणे, काचबिंदू, अचानक येणारा तिरळेपणा, डोळ्यांच्या नसांना (optic nerves) सूज येणे असे विकार होऊ शकतात. सहसा निरोगी व्यक्तींना या वयात मोतीबिंदू होण्याचा धोका कमी असतो. मधुमेह, myopia (निकटदृष्टिता, म्हणजे minus नंबर) जास्त असेल, तर लवकर मोतीबिंदू होण्याची family history असेल, संधिवात आणि काही प्रकारचे चयापचयाचे विकार असतील, दीर्घकाळ corticosteroid औषधे घेण्यात आली असतील, तर मोतीबिंदू लवकर होण्याची शक्यता वाढते. काचबिंदू या विकारात डोळ्यांतील दाब (intraocular pressure) वाढून optic nervesना कायमची इजा होते. रुग्णाच्या दृष्टीचे क्षेत्र हळूहळू कमी होत जाते. बरेचदा रुग्णाला काहीच लक्षणे जाणवत नसल्यामुळे हा आजार सुरुवातीच्या काळात दुर्लक्षित राहतो आणि काचबिंदूमुळे एकदा गेलेली दृष्टी परत मिळविता येत नाही. म्हणून, वरवर निरोगी असणाऱ्या लोकांनीसुद्धा नियमितपणाने नेत्रतपासणी करणे आवश्यक आहे.

बरेचदा केवळ eyedropsनेसुद्धा हा विकार आटोक्यात येतो. Thyroidचा त्रास असणाऱ्या रुग्णांमध्येसुद्धा डोळे कोरडे पडणे, काचबिंदू, तिरळेपणा, काळ्या बुब्बुळाला सूज येणे proptosis आदी तक्रारी उद्भवू शकतात. अशा प्रकारे आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी, विशेषत: चाळिशीनंतर करून घेणे आवश्यक आहे. या लेखाचा उद्देश तुम्हाला घाबरविण्याचा नसून, डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करण्याचा आहे. कारण, जागरूक व्यक्ती म्हणजेच जणू निरामय जीवन हे लक्षात ठेवा.