कलेमुळे जीवन समृद्ध होते, जीवनात प्रत्येकाला एकतरी कला अवगत असावी : श्याम चांडक

    10-Apr-2023
Total Views |
 
art
 
पुणे, 9 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
कलेने जीवन समृद्ध होते आणि व्यक्ती परिपूर्ण होते, म्हणून जीवनात प्रत्येकाला एकतरी कला अवगत असावी. न्यायाधीशांकडेही भरपूर कला आहेत, त्यांनी त्या विकसित कराव्यात, असे विचार प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांनी व्यक्त केले. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या मयूर चित्र कलाकृतींच्या प्रदर्शन समारंभाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे व चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते झाले. सुनील वेदपाठक यांनी आपल्या प्रास्ताविकात मयूर चित्र कलाकृतींकडे आपण कसे आकर्षित झालो आणि ही कला कशी विकसित होत गेली, याचा समर्पक इतिहास उलगडला. प्रमोद कांबळे म्हणाले, सुनील वेदपाठक यांच्या चित्रकृती या कलाक्षेत्रातील अनेकाना कला जोपासण्याचे प्रोत्साहन देतात. या सर्व चित्रांचे एक पुस्तक झाल्यास ते असंख्य लोकापर्यंत पोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रत्येक चित्रात वैविधता आहे.
 
कला ही जीवन समृद्ध करण्याचा मार्ग असून, त्यांची कला ही उत्तुंग दर्जाचे कलाविष्कार प्रकट करणारी आहे. मुरली लाहोटी यांनी सांगितले, की सामान्य माणसाच्या न दिसणाऱ्या भावविश्वाचे चित्रण कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून करतो. कलेची उपासना मनापासून केली, तर ती कलावंतांस चिरतरुण ठेवून त्यास सदैव कार्यरत राहण्याची ऊर्जा प्रदान करते. त्यांची कला ही उतुंग दर्जाचे कलाअविष्कार प्रकट करणारी आहे. त्यांचा प्रत्येक चित्रात वैविधता दिसून येते आणि त्यांनी आपली कला ही मोर या एकाच विषयावर समर्पित केली आहे. कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायाधीश, माजी महसूल आयुक्त उमाकांत दांगट, माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिलीप देशमुख, माजी पोलीस अधिकारी भगवंतराव मोरे, उपजिल्हाधिकारी संजय पवार, डॉ. के. एच. संचेती, भाऊसाहेब जाधव, पुष्कराज पाठक, गंगाराम पाटील उपस्थित होते. न्यायाधीश जागृती भाटिया यांनी सूत्रसंचालन, तर सुनील वेदपाठक यांनी आभार मानले.