उच्चशिक्षित तरुणाची पाेलिसांमुळे कुटुंबीयांशी पुनर्भेट

    27-Mar-2023
Total Views |




Police

मुंबईतील जुहू पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे एका उच्चशिक्षित तरुणाची त्याच्या कुटुंबीयांबराेबर पुनर्भेट झाली. प्रेमभंग झालेला हा तरुण केरळचा असून, ताे मुंबईत भीक मागून जगत हाेता.केरळमधील काेल्लमजवळ असलेल्या करुनागपल्ली या गावचा मूळ रहिवासी असलेल्या अनुप राजशेखरन (वय 37 वर्षे) या तरुणाची फेसबुकवर एका महिलेशी ओळख हाेऊन त्यांचा संवाद सुरू झाला. या काळात ताे या महिलेच्या प्रेमात पडला. आपण जुहूमध्ये राहत असल्याचे या महिलेने सांगितल्यामुळे अनुप तिला भेटण्यासाठी जानेवारी 2022मध्ये मुंबईत आला. मात्र, या महिलेने त्याला झिडकारल्यामुळे नैराश्य येऊन ताे घरी न जाता मुंबईतच भीक मागून राहत हाेता.

पाेलिसांच्या भिक्षेकरीविराेधी माेहिमेच्या काळात त्याला पकडण्यात आले तेव्हा त्याच्याकडे आधारकार्ड मिळाले आणि त्यावरून जुहू पाेलिसांनी अनुपच्या कुटुंबीयांबराेबर संपर्क साधून माहिती घेतली.अनुपने ‘अ‍ॅक्वा कल्चर अँड फिशरिज सायन्स’ या शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्याचे त्याच्या चाैकशीत निष्पन्न झाल्याची माहिती जुहूचे सहायक पाेलिस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी दिली. आपण मुंबईला नाेकरीच्या शाेधात जात असल्याचे सांगून अनुप मुंबईला आला हाेता. मात्र, प्रेमभंग झाल्यावर ताे घरी ना जाता मुंबईतच राहत हाेता. पाेलिसांच्या माेहिमेत कुंजीर यांना अनुप जुहूमध्ये भीक मागताना दिसल्यावर त्यांनी त्याला पाेलिस ठाण्यात आणून चाैकशी केली तेव्हा, अनुपने त्याला कुटुंब नसल्याचे सांगितले.

मात्र, त्याच्याकडील वस्तूंची तपासणी केली तेव्हा आधारकार्ड आणि मल्याळी भाषेतील एक पत्र मिळाले.या पत्रावरील पत्त्यावर पाेलिसांनी केरळमधील करूनागपल्ली पाेलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांबराेबर संपर्क साधल्यावर तेथील पाेलिसांनी बेपत्ता व्यक्तींची नाेंद तपासली. अनुपचा फाेटाेही जुहू पाेलिसांनी केरळ पाेलिसांना पाठविला हाेता. चाैकशीदरम्यान सहायक पाेलिस निरीक्षक प्रशांत अरांगळे यांना अनुपच्या कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक मिळाले आणि त्यांनी अनुपचे वडील राजशेखरन कुटपन (वय 70 वर्षे) यांच्याबराेबर संपर्क साधून अनुपबाबत माहिती दिली.