सिटी ऑफ म्युझिक : बनारस

    20-Mar-2023
Total Views |
 
 

Banaras 
 
बनारस संगीत साधना करणाऱ्यांसाठी असं एक स्थळ बनलं आहे की जिथे लाेक खास संगीत शिकण्यासाठी येतात. मीरजापूर येथील प्रख्यात सारंगीवादक भदाेही हे इथे आले. त्यानंतर त्यांचे वंशजसुद्धा इथे आले. कथ्थक नृत्याचार्य कालिका प्रसाद सुद्धा संगीतसाधना करण्यासाठी बनारस येथे येऊन राहू लागले. धृपद गायक निसार अली खाँ, ख्याल गायक उस्ताद सादिक अली खाँ हेसुद्धा बनारस इथे आले. याशिवाय इथे शिकून गेलेले गायक कायम आपल्याला आपण बनारस इथलेच आहाेत असं म्हणत राहिले. मग ते सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ असाेत किंवा पंडित रविशंकर, किंवा सितारा देवी.बनारस संगीत परंपरेमध्ये महिलांचं याेगदान खूप महत्त्वाचं आहे. जुनं बनारस हे सामंतवादी विचारसरणीचं हाेतं. श्रीमंत आणि प्रतिष्ठित लाेक आपल्या उद्यानात किंवा आपल्या घरी संगीत मैफिलीचं आयाेजन करत असतं.
 
या मैफलीत गायिका मालकंस, बागेश्री आदी राग तसंच धृपद आणि धमार यांच्या कठीण बंदिशी गात असत. तसंच इथं ठुमरी आणि ख्यालसुद्धा गायला जात असे.नृत्यक्षेत्रात सितारा देवी आणि अलकनंदा यांनी आपली कला सादर करून खूप प्रसिद्धी मिळाली हाेती, तर गायनाच्या क्षेत्रात रसूलन बाई, सिद्धेश्वरी देवी आणि वागेश्वरी देवी यांना जाे सन्मान मिळत हाेता ताे आज गिरिजा देवी यांना मिळताे. पंडित गाेपीकृष्ण यांना तर त्यांच्या नृत्याने जगन्मान्यता मिळाली हाेती. गायन, कथ्थक नृत्य, पखवाज वादन, सनई वादन या सर्वच कलांना राजाश्रय आणि उत्तमाेतम कलाकार घडवण्याचं काम आजही बनारस इथे सुरू आहे. संगीत क्षेत्रात आपली कलेची साधना करण्यासाठी आजही अनेक शिष्य इथे आपल्या गुरूकडून संगीत शिकण्यासाठी येत असतात.