परवडणाऱ्या घरांची निर्मिती करा; मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

    08-Feb-2023
Total Views |
 
 
 

construction 
 
प्रत्येकाला स्वतःचे, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. माेठ्या घरांसाेबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दाेन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार आहाेत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एमसीएचआय-क्रेडाई, ठाणे व ठाणे इस्टेट एजंट असाेसिएशनने आयाेजिलेल्या गृहबांधणी प्रकल्पांच्या (प्राॅपर्टी) प्रदर्शनास दिलेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री बाेलत हाेते.
 
यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, क्रेडाई ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, दीपक गराेडिया, राजू व्हाेरा, बांधकाम व्यावसायिक व राज्य शासनाच्या मैत्री समितीचे उपाध्यक्ष अजय अशर, रेमंडचे संदीप माहेश्वरी,एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी उपस्थित हाेते. प्रदर्शनानिमित्त आयाेजित डेस्टिनेशन ठाणे परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.
 
ठाण्यातील वाहतूककाेंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता तयार करणार आहाेत. या कनेक्टिव्हिटीमुळे शहराचा विकास हाेण्यास मदत हाेत आहे. यासाठी केंद्राचे सहकार्य आहे. राज्यातील प्रलंबित प्रकल्पांसाठी सुमारे 2 लाख काेटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरनाईक, अशर, मेहता यांनीही यावेळी मनाेगत व्यक्त केले.