वर्षभरात पिंपरीत 95 बेवारस मृतदेह आढळले

प्रशासनाने केले अंत्यसंस्कार

    08-Feb-2023
Total Views |
 
 DA
 
 
पिंपरी, 7 फेब्रुवारी (आ.प्र.) :
 
पिंपरी-चिंचवड शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यातील व्यसनाच्या आहारी गेलेले, मनोरुग्ण रस्ते, पदपथ, रेल्वे स्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी आपले वास्तव्य करतात. त्यांचा मृत्यू झाल्यास बेवारस म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. गेल्या वर्षभरात शहरात असे 95 बेवारस मृतदेह आढळून आले. पिंंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत 2022 मध्ये वर्षभरात 95 बेवारस मृतदेह आढळून आले. त्यांच्या वारसांचा, तसेच नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. मात्र, या मृत व्यक्तींची ओळख पटू शकली नाही.
अनोळखी, बेवारस मृतदेह आढळल्यास पोलिस त्याचा पंचनामा करतात. त्याच्या वारसांचा शोध लागेपर्यंत मृतदेह महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवागृहात ठेवले जातात. शोध लागल्यावर कायदेशीर बाबींची पूर्तता करून मृतदेह वारसांच्या हवाली केला जातो. काही मृतदेहांची ओळखच पटत नाही. वारसांचा शोध लागत नाही. त्यामुळे मृतदेहाच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न उभा राहतो. असे मृतदेह शवागरात काही दिवसांपर्यंत पडून असतात. शोध लागला नाही, तर महापालिकेकडे ते सोपवले जातात. त्यांच्यावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात.
 
 
महापालिकेच्या निवारा केंद्राचा आधार
 
बेघर आणि भटक्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात अशा भटक्या, बेघर व्यक्तींना दाखल केले जाते. त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला जातो. अनेकांना त्यांच्या घरी पाठवले जाते. मात्र, बहुतांशी जण मनोरुग्ण असतात. तर, काही जण आपली ओळख लपवून ठेवतात. त्यामुळे महापालिकेच्या निवारा केंद्राचाच त्यांना आधार असतो. मात्र, मृत्यूनंतर बेवारस म्हणूनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते.