माजी शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याकडे तीन कोटी 59 लाख बेकायदा मालमत्ता

एसीबीच्या कारवाईत मालमत्ता उघड झाल्यावर गुन्हा दाखल

    08-Dec-2023
Total Views |
 
ill
 
पुणे, 7 डिसेंबर (आ.प्र.) :
 
टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी माजी तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पुणे तुकाराम नामदेव सुपे यांची मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे यांनी चौकशी केली. त्यात तीन कोटी 59 लाख 99 हजार रुपये त्यांनी भ्रष्टाचारातून कमावले असल्याचा सांगितले आहे. हे पैसे 1986 ते 25 डिसेंबर 2021 दरम्यान कमावले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. श्रीराम विष्णू शिंदे यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक आहेत. त्यानुसार आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 13(1) (ई), 13 (2), भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारित कायदा 2018 चे कलम 13 (1) (ब) व 13 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांचे विरोधात भरती घोटाळ्याबाबत सन 2021 मध्ये पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात एसीबीकडून त्यांच्या शासकीय कार्यकाळातील मालमत्तेची तपासणी करण्यात येत होती. या गुन्ह्याच्या तपासात तुकाराम सुपे यांच्याकडून आतापर्यंत दोन कोटी 87 लाख 99 हजार रुपये रोख व 72 लाख रुपये किंमतीचे 145 तोळे सोने मिळून आले आहे. त्यामुळे तब्बल तीन कोटी 59 लाख 99 हजार रुपयांची मालमत्ता ही भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या लोकसेवक सेवा कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपीवर सांगवी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास एसीबीचे पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले करत आहे.