थायी भक्ताकडून दगडूशेठ गणपती ट्रस्टला रुग्णवाहिका

06 Dec 2023 14:59:07
 
dag
 
पुणे, 5 डिसेंबर (आ.प्र.) :
 
श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती जगभरात आहे. दगडूशेठचे गणपती बाप्पा लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असून, थायलंडमधील फुकेतमधून अनेक भाविक दरवर्षी पुण्यात ‌‘श्रीं'च्या दर्शनाला सातत्याने येतात. त्यातील एक भक्त पापासॉर्ण मिपा यांनी दगडूशेठच्या सामाजिक कार्याला हातभार लावत जय गणेश रुग्णसेवा अभियानासाठी दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाकडे पापासॉर्ण मिपा यांनी या रुग्णवाहिका नुकत्याच सुपूर्द केल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पापासॉर्ण मिपा म्हणाल्या, की ट्रस्ट गोरगरीब वंचितांना मदत देण्यासोबत विविध रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्यसेवा देत आहे.
 
आमचे भाग्य आहे की आम्ही ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचा या माध्यमातून छोटासा भाग होऊ शकलो. थायलंडहून अनेकांना पुण्यात दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे. मात्र, अंतर खूप असल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे मी फुकेतमध्ये मंदिर उभारत आहे, असेही त्यांनी सांगितले. ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या विद्यमाने नुकतेच जय गणेश प्रांगणात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यात 378 जणांनी वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. यातून 113 जणांच्या विविध शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहेत. तसेच या आरोग्य शिबिरात आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड 92 जणांना काढून देण्यात आले. तसेच, रुग्णसेवा अभियानांतर्गत लायन्स क्लब ऑफ कात्रजच्या विद्यमाने गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड भागातील 68 नेत्ररुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीने यशस्वीरित्या करून देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0