पुणे, 5 डिसेंबर (आ.प्र.) :
रेल्वेचे टाकाऊ डबे अनेक वेळा तसेच पडून असतात अथवा भंगारात जातात. अशाच एका टाकाऊ डब्याचा वापर करून त्याचे रूपांतर उपाहारगृहात करण्याची किमया रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे. घोरपडी डिझेल शेड कार्यशाळेत उपाहारगृह सुरू झाले असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांची भोजन आणि नाश्त्याची सोय झाली आहे. पुणे विभागात घोरपडीत डिझेल शेड कार्यशाळा 1982 पासून कार्यरत आहे. सध्या तेथे आठशेहून अधिक कर्मचारी तीन पाळ्यांत अहोरात्र काम करतात. तेथील कर्मचाऱ्यांचे हित समोर ठेवून आता त्यांच्यासाठी उपाहारगृह सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी जुन्या, मोडकळीस आलेल्या डब्यात बदल करून हे उपाहारगृह साकारले आहे.
यांत्रिकी विभागाने दिलेल्या वापरात नसलेल्या रेल्वे डब्यात आवश्यक बदल करून आकर्षक स्वरूपात हे उपाहारगृह तयार करण्यात आले आहे. कार्यशाळेत मोठ्या संख्येने कर्मचारी काम करत असल्याने उपाहारगृह सुरू करावे, अशी मागणी होत होती. उपाहारगृह सुरू झाल्याने आता कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता, जेवणासाठी बाहेर जावे लागणार नाही. या उपाहारगृहामुळे कर्मचाऱ्यांच्या खाण्याच्या सुविधेसोबत रेल्वेला महसूलही मिळणार आहे. या उपाहारगृहाची जबाबदारी किन इंडिया (बंगळुरू) या संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, किन इंडियाचे सय्यद हसनैन अश्रफ यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपाहारगृहाच्या उद्घाटनावेळी तेथील खाद्यपदार्थांची चव चाखली.