पुणे, 5 डिसेंबर (आ.प्र.) :
इज ऑफ लिव्हिंगनुसार ग्राहकसेवा देताना महावितरणच्या पुणे परिमंडलाने गेल्या वर्षी डिसेंबर ते यावर्षी नोव्हेंबर या एका वर्षात विक्रमी 2 लाख 33 हजार 609 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. त्यापूर्वी दोन ते तीन वर्षांत नवीन वीजजोडणी देण्याचा दरमहा सरासरी वेग 15 हजार ते 16 हजार होता. तो आता दरमहा 19900 वर गेला आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इज ऑफ लिव्हिंगनुसार ग्राहकसेवा गतिमान करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी प्रामुख्याने ग्राहक तक्रार निवारण व नवीन वीजजोडण्यांना वेग देत ग्राहकसेवा आणखी गतिमान केली आहे. याबाबत परिमंडल स्तरावर संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
पुणे परिमंडलात 2022-23 या आर्थिक वर्षांत 1 लाख 95 हजार 986 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. त्याआधीच्या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास दरमहा सरासरी 15350 ते 16350 वीजजोडण्या देण्यात येत होत्या. त्यानंतर नवीन वीजजोडण्यांना मोठा वेग दिल्याने डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत 2 लाख 33 हजार 609 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच्या आठ महिन्यांत सर्व वर्गवारीच्या 1 लाख 59 हजार 209 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग दरमहा सरासरी 19900 वर गेला आहे. परिमंडलात नवीन वीजजोडण्या व आवश्यकतेनुसार वीजमीटरचा पुरवठा व्हावा, यासाठी दर आठवड्यात दोनदा मुख्य अभियंता राजेंद्र पवार आढावा घेत आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी गतिमान झाली आहे. गेल्या वर्षभरात कार्यान्वित झालेल्या 2 लाख 33 हजार 609 वीजजोडण्यांत घरगुती ः 1 लाख 97 हजार 180, वाणिज्यिक ः 26739, औद्योगिक ः 3821, कृषी ः 2829 व इतर 3040 जोडण्यांचा समावेश आहे.