कवितेचे नाते थेट हृदयाशी आहे.नातेसंबंध तुटत चाललेल्या आजच्या काळात माणूसपणाशी नाते जाेडणारी महेंद्र काेंडे यांची कविता बावनकशी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी अशाेक नायगावकर यांनी केले. कवितेवर काळाची पुटे चढत नाहीत. त्यामुळे भविष्यातील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या काळातही कविता तशीच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.महेंद्र काेंडे यांच्या ‘बावनकशी’ या कवितासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन नायगावकर यांच्या हस्ते ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात झाले. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाण्याचे आयुक्त अभिजित बांगर, उद्याेजक व लेखक प्रफुल्ल वानखेडे, सकाळ प्रकाशनचे व्यवस्थापकीय प्रमुख आशुताेष रामगीर व कवी महेंद्र काेंडे उपस्थित हाेते.
‘कशासाठी धावताेय, कुणासाठी धावताेय’ याचा विवेक गमावण्याच्या आजच्या काळात जगणं वाहून जातंय आणि जगायचं राहून जातंय. अशा स्थितीत बावनकशीसारख्या कविता नवी ऊर्जा देतात, असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले. बावनकशी म्हणजे शंभर नंबरी शुद्ध साेने असून, महेंद्र काेंडे यांचे व्यक्तिमत्त्व तसेच असल्याचे मत बांगर यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशित झाले म्हणजे काम संपले नाही, तर प्रकाशकाप्रमाणेच लेखकानेही वाचकांपर्यंत पुस्तक पाेहाेचवण्याचे काम करावे, असे वानखेडे यांनी सांगितले. बावनकशी काव्यसंग्रह लवकरच ई-बुक, ऑडिओ बुक स्वरूपात यावा, जेणेकरून पुस्तक हातात घेऊन न वाचणारी आधुनिक पिढी त्याचे इंटरनेटवरून वाचन करू शकतील, अशी सूचना त्यांनी केली.