भारतातील बैठे खेळ नव्या स्वरूपात लाेकप्रिय

    29-Nov-2023
Total Views |
 
 

game 
दीपावलीचा काळ म्हणजे दैनंदिन जीवनातील धावपळीपासून थाेडा विरंगुळा. नातलग, मित्र आणि प्रियजनांच्या भेटी, बाहेर फिरणे, खरेदी असे कार्यक्रम असतात. याच काळात अनेक बैठे खेळही देशभरात खेळले जातात. बैठे खेळ किंवा बाेर्ड गेम्सची आपल्याकडे माेठी परंपरा आहे.यातील काही खेळ विशिष्ट प्रदेशांतच खेळले जातात, तर काही देशभर. या खेळांना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असते आणि त्यातून मेंदूला उत्तम व्यायाम हाेताे.बुद्धिबळ ही भारताने जगाला दिलेली देणगी मानली जाते आणि ‘चतुरंग’ हा खेळ त्याचा पूर्वज आहे. सुमारे सहाव्या शतकातील गुप्त साम्राज्याच्या काळात हा खेळ सुरू झाला आणि बुद्धिबळ हे त्याचे आधुनिक स्वरूप आहे. आजच्या साप-शिडी या खेळाचा पूर्वज आहे ‘माेक्षपट’ हा खेळ आणि ‘पाचिसी’ हा खेळ म्हणजे आजचा लुडाे. दक्षिण भारतातील ‘पल्लनकुझी’ हा खेळ वेगळाच आहे. हे सगळे खेळ प्राचीन असले, तरी नव्या काळात ते विस्मृतीत जाऊ लागले आहेत.
 
मावळा-द बाेर्ड गेम छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यापासून प्रेरणा घेत अनिरुद्ध राजदेरकर यांनी मधू सुंदर आणि फाल्गुन माेझेक जेम्स यांच्या मदतीने ‘मावळा-द बाेर्ड गेम’ विकसित केला आहे. ‘मला पाच वर्षांचे मूल असून, या वयाच्या मुलांना इतिहासातून स्फूर्ती मिळावी या विचारांतून मी या गेमबाबत काम सुरू केले. आपण काेण आहाेत याची जाणीव इतिहासातूनच हाेते,’ असे अनिरुद्ध हे सांगतात. हा खेळ दानांचा असून, त्यातून मराठी साम्राज्याबाबत माहिती मिळते. यातील प्रत्येक खेळाडू म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा सैनिक (मावळा) असताे आणि श्री शिवाजी महाराजांसाठी ताे काम करताे. हे मावळे किल्ल्यांचे रक्षण करतात.‘इतिहासाची माहिती असल्याशिवाय देशाबाबत निष्ठा निर्माण हाेत नाही आणि आपल्या मुलांना इतिहासाचे ज्ञान देण्यासाठी हा खेळ उत्तम आहे,’ असे ते म्हणतात. या खेळाच्या माध्यमातून आपण आपला गाैरवशाली इतिहास जाणून घेण्याबराेबरच ताे जपूनही ठेवू शकताे, असे ते सांगतात. तुम्हाला ‘मावळा-द बाेर्ड गेम’ हवा असेल, तरthemawala.com वरून मागविता येईल. त्याची किंमत 1,799 रुपये आहे.