पिंपरी, 19 नोव्हेंबर (आ.प्र.) :
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका शहरातील मुख्य चौक, रस्त्यांचे सर्वेक्षण करणार आहे. त्यात रस्ता सुरक्षा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्ट्रीट सर्ज टेक्रोलॉजीस या संस्थेची नेमणूक केली आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येच्या मानाने खासगी वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील प्रशस्त रस्ते वाहतुकीस अपुरे पडत आहेत. मॉल, हॉटेल, मंगल कार्यालय, भाजी मंडई, चित्रपटगृहे, रुग्णालय, उद्यान, बस स्थानक, व्यापारी संकुल, चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. तसेच, प्रत्येक मोठ्या चौकात सिग्नल यंत्रणा कार्यरत आहे.
मात्र, चौकातील व्यावसायिक अतिक्रमण, वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग, विक्रेत्यांची वाढती संख्या आदी कारणांमुळे कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरातील मुख्य चौक, रस्त्यांचे सर्वेक्षण करणार आहे. त्यात रस्ता सुरक्षा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्ट्रीट सर्ज टेक्रोलॉजीस या संस्थेची नेमणूक केली आहे. शहरातील विविध भागांत प्रशस्त चौक आहेत. मात्र, त्यानंतरही बहुतांशी चौकांत वाहतूक कोंडी होते. चौकांतील हे अडथळे दूर करून सुरक्षित वाहतूक रहदारी करण्यासाठी खासगी संस्था नेमून परीक्षण केले जाणार आहे. परीक्षणानंतर प्राप्त झालेल्या अहवालानंतर तशा सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे चौकांमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले.