विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यप्रणाली विकसित करणार : कुलगुरू

    20-Nov-2023
Total Views |
 
sys
 
पुणे, 19 नोव्हेंबर  (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्वसमावेशक कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर-एसओपी) विकसित करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले. विद्यापीठ, पोलिस आणि विद्यार्थी संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन शर्मा, प्र-कुलगुरू पराग काळकर, माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. नितीन घोरपडे, बागेश्री मंठाळकर, सिनेट सदस्य डॉ. देविदास वायदंडे, प्रसेनजीत फडणवीस, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले व विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
कुलगुरू म्हणाले, ‌‘विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्यासाठी एकत्रित काम करण्याचे करावे व कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मागवा. तसेच, एसओपीचे सर्वांनी तंतोतंत पालन केले, तर विद्यापीठात गोंधळ होणार नाही. संघटनांचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित राखून विद्यापीठाशी संलग्नित असलेले त्यांचे प्रश्न मार्गस्थ करण्यासाठी नवीन कार्यप्रणालीचा उपयोग होईल. लोकशाही मार्गाने विद्यापीठातल्या विविध प्रश्नांबाबत विविध संघटनांमार्फत होणारी आंदोलने, सभा, कार्यक्रम कार्यप्रणालीच्या चौकटीत राहून करावेत,' असे आवाहन त्यांनी केले. पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‌‘गेल्या कांही दिवसात जे वातावरण विद्यापीठात निर्माण झाले आहे, अशा प्रकारचे वातावरण मी यापूर्वी कधीही पहिले नाही. असे प्रकार पुन्हा होणार नाहीत ही सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी आपले करिअर खराब करू नये व आंदोलनात वेळ घालवू नये. सनदशीर मार्गाने तक्रार करण्यासाठी विज्ञापीठ, पोलिस आहेत. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे हे पोलिसांनाही नको असते. पण, शेवटी शिस्तीसाठी कायदा लागू होणारच. कोणीही कायदा हातात घेऊ नये,' असे आवाहन त्यांनी केले.