पर्यटकांना शनिवारवाडा आता डिजिटल गाइडच्या माध्यमांतून अनुभवता येणार

    20-Nov-2023
Total Views |
 
sh
 
पुणे, 19 नोव्हेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या शनिवारवाड्याचा इतिहास आता पर्यटकांना डिजिटल ऑडिओच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार असून, त्यासाठी विद्युत विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला शनिवारवाडा हा केवळ पुण्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. 1730 मध्ये शनिवारवाड्याचे बांधकाम सुरू झाले, तर 1732 मध्ये शनिवारवाड्याची वास्तुशांत झाली. यानंतर मराठेशाहीचा भरभराटीचा आणि अस्ताचाही काळ शनिवारवाड्याने अनुभवला आहे. त्यामुळेच राज्याबरोबरच देश-विदेशातील पर्यटक शनिवारवाड्याला आवर्जून भेट देत असतात.
 
पुरातत्त्व विभागातर्फे 1919 मध्येच शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे शनिवारवाडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अधूनमधून येथे वारसा फेरी म्हणजे हेरिटेज वॉकही आयोजित केला जातो. सायंकाळी येथे साउंड अँड लाइट शोद्वारे शनिवारवाड्याची, पेशव्यांच्या इतिहासाची माहितीही दिली जाते. मात्र, दिवसा येथे येणाऱ्या पर्यटकांना केवळ तज्ज्ञ गाइड अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच पालिकेकडून शनिवारवाडा परिसरात डिजिटल ऑडिओ गाइड सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
 
या अंतर्गत शनिवारवाडा परिसरात क्यूआर कोड असलेले फलक बसविले जातील. पर्यटक आपल्या मोबाइलद्वारे हा कोड स्कॅन करतील. त्यानंतर मराठी, हिंदी अथवा इंग्रजीतून त्यांना शनिवारवाड्याचा इतिहास ऐकता येणार आहे. मराठीसाठी 50 रुपये, हिंदीसाठी 75 रुपये, तर इंग्रजीतून माहितीसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. परदेशी पर्यटकांसाठी अन्य भाषांमधूनही लवकरच ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क भरल्यानंतर पर्यटकांना त्यांच्या मोबाइलद्वारे ही माहिती ऐकता येईल. यासाठी क्यूआर कोडचे फलक पालिकेतर्फे उभारले जातील. तर, डिजिटल ऑडिओ गाइडसाठीचे तंत्रज्ञान व पूरक यंत्रणेची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर असेल. या सेवेतून मिळणारे उत्पन्न पालिका व संबंधित कंत्राटदार कंपनी समसमान प्रमाणात वाटून घेणार आहे.