पुढील वर्षापासून एक वर्षाचापीजी अभ्यासक्रम सुरू होणार

    20-Nov-2023
Total Views |

P 
 
पुणे, 19 नोव्हेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
देशात प्रथमच पुढील शैक्षणिक वर्षापासून एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट-पीजी) अभ्यासक्रम सुरू होणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना एक वर्ष आणि दोन वर्षांच्या पीजीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. तसेच पदवीसाठी जो विषय घेतला जाणार आहे तोच विषय निवडण्याचे बंधन असणार नाही. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या संबंधित विषयात पात्रता मिळवून मास्टर्सचा अभ्यास करू शकतील. यूजीसीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत तयार केलेल्या पदव्युत्तर कार्यक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क मंजूर करण्यात आले आहे. हा मसुदा या आठवड्यात राज्ये आणि विद्यापीठांना पाठवला जाणार असल्याचे यूजीसीचे अध्य्क्ष प्रा. जगदीश कुमार यांनी सांगितले. नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत, 4 वर्षांच्या यूजीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या पदव्युत्तर पदवीचा पर्याय मिळेल.
 
याशिवाय 3 वर्षांचा यूजी (अंडर ग्रॅजुएट) म्हणेजच पदवी प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांचा मास्टर्सचा अभ्यास करावा लागेल. याशिवाय नवीन नियमांनुसार आता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे माध्यम बदलण्याचा पर्यायही मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑफलाइन, ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (दूरस्थ शिक्षण), ऑनलाइन लर्निंग आणि हायब्रीडच्या माध्यमातून त्यांच्या सोयीनुसार अभ्यास करता येणार आहे. नवीन अभ्यासक्रमात बहुविद्याशाखीय अभ्यासाची सुविधा असेल. नव्या नियमांमधील हा सर्वांत मोठा बदल आहे. उदाहरणार्थ, चार वर्षांच्या यूजी प्रोग्राममध्ये, जर एखाद्या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र हा मुख्य विषय म्हणून आणि अर्थशास्त्र हा दुसरा विषय म्हणून अभ्यास केला असेल, तर आता तो मास्टर्समध्ये प्रमुख आणि इतर विषयांपैकी कोणताही विषय निवडण्यास सक्षम असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला पीजीमध्ये शाखा (स्ट्रीम) बदलायची असेल, तर तोही पर्यायही उपलब्ध असेल.