आंतरराष्ट्रीय वाहन परवाने काढण्याचे प्रमाण वाढले

    19-Nov-2023
Total Views |
 
i
 
पुणे, 18 नोव्हेंबर (आ.प्र.) :
 
परदेशांत वाहन चालविण्याचा फीलच भारी, त्यामुळे आता परदेशांत नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्यांसह पर्यटनाला जाणाऱ्या व्यक्तीही पुण्यातून जाताना वाहन चालविण्याचा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स) काढून घेतात. मागील दोन वर्षांत अशा प्रकारचा परवाना काढण्याचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे दिसून येते. यंदा अवघ्या सात महिन्यांत 3 हजार 674 व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढल्याचे आरटीओ प्रशासनाकडील आकडेवारीतून समोर येते. नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने भारतील अनेकजण दोन-तीन वर्षांसाठी परदेशांत जातात. त्यावेळी परदेशांत वाहन चालविण्याचा परवाना असलेला बरा, या उद्देशाने विद्यार्थ्यांसह नागरिक भारतातून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढून नेतात.
 
मात्र, मागील काही महिन्यांपासून परदेशांत फिरायला जाणारे पर्यटकही अधिक वाढले. तेथील वाहन आणि चालक घेतला, तर खर्च खूपच वाढतो. तेच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास फक्त गाडी भाडेतत्त्वावर घेऊन खर्च कमी होतो. त्यामुळे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे; तसेच परदेशांत वाहन चालविण्याची हौसदेखील पूर्ण होते. आंतरराष्ट्रीय परवान्यासाठी अर्जदाराला वाहन चालविण्याची चाचणी अथवा इतर परीक्षा द्यावी लागत नाही. मात्र, त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि व्हिसा याची पडताळणी केली जाते. ही सर्व प्रक्रिया आता ऑनलाइनदेखील झाली आहे. परिवहन वेबसाइटवरून सारथी सर्व्हिसअंतर्गत अर्ज करावा लागतो. त्यानंतर ऑनलाइन शुल्क भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. त्यानंतर एका दिवसात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळते.
 
भारतासोबत करार झालेल्या देशांत वाहन चालविण्यासाठी भारतात दिलेले इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स ग्राह्य समजले जाते. तो परवाना जड वाहने वगळून सर्व वाहनांसाठी ग्राह्य धरला जातो. त्यामध्ये अमेरिका, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, न्यूझीलंड यांसह आणखी काही देशांचा समावेश आहे. हे लायसन्स एका वर्षासाठी वैध असते. या लायसन्सचा वापर काही देशांत ओळखपत्र म्हणूनही करता येतो.
 
आवश्यक कागदपत्रे :
सध्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत. प्रवास करत असलेल्या देशाचा पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत. प्रवासासाठी काढलेल्या तिकिटाची प्रत, पुरावे. वयाचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत. भारतीय नागरिकत्वाचा प्रमाणित पुरावा आणि पासपोर्ट फोटो. स्वाक्षरी केलेले आणि वैध वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट.
 
पूर्वी शिक्षण-नोकरीसाठी जाणारे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेत होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून पर्यटनाला जाणारेही हा परवाना घेत असल्याचे दिसून येते.
                                                                                                               -संजीव भोर (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे)