प्रेम ही माेठी विलक्षण भावना आहे आणि ती नसती तर जीवन अगदी रूक्ष आणि निरस झाले असते. प्रेम म्हणजे एखाद्याविषयी वाटणारी माया अथवा आपुलकीची, जवळीकीची भावना. ते केवळ जाेडीदारांमध्येच नसते, तर पालक-मुले, बहीण-भाऊ, मित्र, नातलग असे अनेक घटक त्यात येतात.प्राणीसुद्धा त्यांच्या पिलांवर प्रेम करतात आणि प्रसंगी जीवाची बाजी लावून पिलांचे रक्षण करतात. काेणत्याही कटू प्रसंगातून बाहेर येण्यासाठी प्रेम उपयुक्त ठरते. प्रत्येक सजीव प्रेमाचा भुकेला असताे.एका व्यक्तीचा अनुभव पाहा.
ताे पुरुष एकदा लहान मुलांच्या अनाथालयात गेला हाेता, तेव्हा त्याने तेथील एका बाळाला कडेवर घेतले. काेणीतरी आपल्याला मायेने जवळ घेतल्याचे त्या बाळाला जणू समजले आणि ते त्या पुरुषाला घट्ट बिलगले. त्या बाळाच्या छाेट्याशा हातांचा नाजूक स्पर्श आणि त्याची घट्ट मिठी मी अजून विसरलाे नसल्याचे हा पुरुष म्हणताे. म्हणजेच, प्रत्येकाला प्रेम हवे असते हे सिद्ध झाले. प्रेम म्हणजे जणू जीवनातील ऑ्निसजन असताे. पण, प्रेम म्हणजे नक्की काय? आपण त्याची एवढी वाट का पाहताे? प्रेम ही केवळ एक भावना नसून त्यापेक्षाही बरेच काही त्यात आहे.वास्तवात पाहिले, तर प्रेमाची अनेक रूपे आहेत. त्यातील पाच प्रमुख आहेत.
1) धैर्याच्या रूपातील प्रेम : प्रेम म्हणजे केवळ माया आणि आपुलकी नाही, तर धैर्यसुद्धा आहे. एकदा एक पुरुष ध्यान करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा लहान मुलगा गाेंधळ करत हाेता. वैतागून त्या पुरुषाने मुलाला थप्पड मारली. मुलगा रडायला लागल्यावर त्या पुरुषाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. म्हणजेच, आपल्यावर प्रेम करणाऱ्यांबाबत धैर्याची गरज असते. धैर्यातून प्रेमाची अभिव्यक्ती दिसते. एखादी व्यक्ती आपली सहायक किंवा आपल्या प्रगतीतील अडथळा न समजणे हे झाले धैर्य.
परिणामांपेक्षा धैर्य चांगली फळे देते आणि त्यामुळे जीवन प्रेममय तसेच आनंदी हाेते. आपल्या जीवनयात्रेत अनेक सुहृद त्यातून भेटतात. आपल्या चुका स्वीकारण्याच्या धैर्यामुळे कटू प्रसंगांतून बाहेर येण्यास मदत हाेते आणि धैर्य आपल्याला वर्तमानात जगायला शिकविते. धैर्यशील व्यक्ती कधीच अतिउत्साही नसते तसेच ती भ्रमातही राहत नाही. धैर्यामुळे जीवनात प्रेम वाढते.
2) दयेच्या रूपातील प्रेम : दयाळू वृत्तीमुळे किती फरक पडताे ते पाहा. एकदा एकाचे वडील आजारी पडल्याने त्याला घरी तातडीने जाणे आवश्यक हाेते आणि त्यासाठी विमान हा सर्वाेत्तम पर्याय हाेता. तिकीट बुक करण्यासाठी त्याने फाेन केला आणि संबंधित महिलेला तिकीट लवकरात लवकर देण्याची विनंती केली. तुमचे वडील आजारी आहेत, असे समजून मला मदत करा, असे ताे म्हणाल्यावर त्या महिलेने त्याला लवकरात लवकर विमानतळावर येण्यास सांगितले. ताे पाेहचताच त्याला तिकीट मिळाले आणि ताे वडिलांकडे जाऊ शकला. या महिलेने केलेली मदत ताे पुरुष कधीही विसरणार नाही. यातून त्या महिलेची दयाळू वृत्ती दिसली आणि ती प्रेमाचीच एक अभिव्यक्ती हाेती. आपणही दया दाखवून प्रेम वाढवू शकताे. समस्येने गांजलेल्या व्यक्तीची व्यथा शांतपणाने ऐकून घेणे हेसुद्धा माेठे काम असते. वेगाने वाहणाऱ्या नदीचे पाणी तळात शांत असते. ते कितीही दगडांवरून जात असले, तरी त्यात खळखळाट नसताे. दयासुद्धा अशीच असते. आपण केलेल्या छाेट्या कामांमुळे जीवनात सामंजस्य वाढते. तुम्ही शांतपणाने इतरांना दया दाखविलीत तर संकटाचा काल मागे पडताे. दया हे प्रेमाचेच एक रूप असल्याचे तुम्हाला समजते.
3) इतरांच्या आनंदातील प्रेम : इतरांच्या आनंदात सहभागी हाेण्यासाठी मन विशाल असावे लागते. पण, काेणाचे यश पैशांमध्ये माेजले जाते तेव्हा फक्त ईर्षा उत्पन्न हाेते आणि आपले जीवन दु:खी हाेते. यश कधी सहजसाध्य नसते. इतरांच्या आनंदात काेणत्याही अपेक्षेविना सहभागी झालात, तर तुम्ही समाधानी राहता. आपण सगळे एकाच मार्गावरचे प्रवासी असल्याने ताे आनंदाने करणे हिताचे असते. इतरांच्या आनंदात सहभागी हाेण्यामुळे संबंध दृढ हाेतात.हेही प्रेमच असते.
4) सद्भावाच्या रूपातील प्रेम : एखाद्या ऑर्केस्ट्रातील सर्व वादक एकमेळाने वाद्ये वाजवितात तेव्हा त्यातून मधूर स्वर निर्माण हाेतात. काेणालाही कमी न लेखता सर्वांना समान मानण्यामुळे सद्भाव निर्माण हाेताे. आपण मानसिक सुखापेक्षा घर, गाड्या, पैसे अशा भाैतिक सुखांचा विचार जास्त करताे आणि त्यामुळे आपण आपल्यालाच असमाधानी करताे. आपण सद्भावनेकडे जास्त लक्ष दिले, आपल्या चुका स्वीकारल्या, तर जीवन अर्थपूर्ण हाेते.इतरांच्या चुका विसरून त्यांना क्षमा करणे ही झाली सद्भावना आणि तीसुद्धा प्रेमाचे एक रूप असते.
5) सहानुभूतीच्या रूपातील प्रेम : इतरांबाबत सहानुभूती दाखविणे हासुद्धा प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. काेणाच्या आयुष्यातील दु:खद प्रसंगी त्याला मदत करणे, धीराचे दाेन शब्द बाेलणे, सहकाऱ्यांबाबत संवेदनशील असणे आदींतूनही सहानुभूती व्यक्त करता येते.सहानुभूती ठेवलीत, तर संबंध अधिक चांगले राहतात. एखादा व्यापारी त्याच्या ग्राहकांच्या सुख-दु:खांत सहभागी हाेत असेल, तर त्याचा व्यवसाय चांगला हाेणारच. आपल्या कामावर प्रेम करायला लागलात, तर नाेकरी म्हणजे एक निरस काम न ठरता आनंदाचा भाग हाेते. केवळ वेतन मिळण्यासाठी काम, असे धाेरण बदला. तुम्ही कराल तेवढे प्रेम वाढते आणि ते काेणत्याही पद्धतीने करता येते.